अंधारबनातील तरुणांचा अद्याप तपास सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:45 AM2017-07-26T06:45:51+5:302017-07-26T06:45:53+5:30
मुळशी तालुक्यातील पिंपरी परिसरातील अंधारबनात आपल्या मित्रांसोबत २२ जुलै रोजी पर्यटनासाठी गेले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास खोल दरीत वाहून
पौड : मुळशी तालुक्यातील पिंपरी परिसरातील अंधारबनात आपल्या मित्रांसोबत २२ जुलै रोजी पर्यटनासाठी गेले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास खोल दरीत वाहून गेलेल्या त्या दोन तरुणांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
पौड पोलीस स्टेशन, मुळशी तालुका महसूल विभागाचे आपत्ती व्यवस्थापन, पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, लोणावळा येथील शिवदुर्ग संवर्धनचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व जीवरक्षक दलाचे काही जवान असे एकूण २३ जणांचे पथक युद्धपातळीवर शोध घेत आहेत.
२२ जुलै रोजी पुणे येथील काही तरुण मुळशीतील पिंपरी येथे पर्यटनासाठी आले होते. यावेळी ते पिंपरी येथून हिरडी गावाकडे जाणाºया रस्त्याने जंगलातून जात असताना उंच डोंगरावरून वाहत येऊन अंधारबन दरीत जाणारा एक नाला ओलांडत असताना पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने त्यातील राहुल दुधे (वय ३२) व राहुल उमाटे (वय २९) हे दोघेजण पाय घसरून पाण्याच्या प्रवाहाबरोबरदरीत वाहून गेले होते. या दोघांचा अद्यापही तपास लागलेला नाही. या ठिकाणी होत असलेल्या अतिपावसामुळे व दिवसा पडणाºया अंधारामुळे शोधकार्यात अडचण येत असल्याची माहिती मुळशीतील जीवरक्षक दलाचे कार्यकर्ते प्रमोद बलकवडे यांनी दिली.
दुर्घटना घडलेल्या परिसरात व ओढ्याच्या शेवटापर्यंत दोन्ही बाजुने कसून शोध घेण्यात येत आहे. परंतु दोघांचाही पत्ता लागला नाही. हा ओढा पूर्णपणे खडकाळ असल्याने त्यात झाडे, झुडपे नाहीत. त्यामुळे दोघेही खालील दरीत रायगड जिल्ह्याच्या हद्दीत वाहून गेले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होत; परंतु त्याही ठिकाणी या तरुणांचा तपास लागला नाही. त्याच ठिकाणी काही अंतरावर खडकात ते अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन दरीच्या उगम स्थानीच अधिक तपास करण्याच्या हेतूने मंगळवारी तपास करण्यात आला. या तपास कामात रायगड पोलीस व प्रशासनही मदत करीत आहे. त्यांच्याकडूनही भिरा बाजुने शोध सुरू केला आहे.