अंदुरे, कळसकरनेच झाडल्या गोळ्या; सीबीआयचा न्यायालयात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 01:04 AM2019-02-14T01:04:43+5:302019-02-14T01:06:29+5:30
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला आहे.
पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला आहे. यापुढील कार्यवाही म्हणून त्यांनी बुधवारी विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सीबीआयने २०१६ मध्ये सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी बेंगलोर येथील पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने, दाभोलकर यांचेवर गोळ््या झाडणारा औरंगाबादचा हल्लेखोर सचिन अंदुरे यास पिस्तुल आणि दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीआयने पुणे न्यायालयात केला होता.
डॉ. वीरेंद्रसिंग तावडे यांच्या सोबतीने इतर आरोपींनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी मोटारसायकलवरून आलेले दोन हल्लेखोर अंदुरे आणि कळसकरच होते, असे आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. २० आॅगस्ट २०१३ रोजी (घटनेच्या दिवशी) ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वासात वाजण्यापूर्वी त्याठिकाणी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोलकर नेमके कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचे उघडकीस आले. मारेकऱ्यांना दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ््या झाडण्यात आल्या आहेत, असे शरद कळसकरकडे केलेल्या चौकशीत समोर आले आहे.
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्यासह कळसकर याने मुंबई, ठाणे परिसरातील खाडीत चार पिस्टलची विल्हेवाट लावल्याचा दावा ही सीबीआयने यापूर्वी न्यायालयात केला होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात लवकरच अन्य आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.