पुणेकरांच्या अंगाची काहिली
By admin | Published: March 28, 2016 03:17 AM2016-03-28T03:17:37+5:302016-03-28T03:17:37+5:30
शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून आज सर्वाधिक ३९.८ अंश सेल्सिअस तापमान लोहगाव येथे नोंदविले गेले. सूर्य आग ओकत असल्याने पुणेकरांच्या अंगाची काहिली काहिली
पुणे : शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून आज सर्वाधिक ३९.८ अंश सेल्सिअस तापमान लोहगाव येथे नोंदविले गेले. सूर्य आग ओकत असल्याने पुणेकरांच्या अंगाची काहिली काहिली होऊ लागली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असूनही उन्हामुळे अनेक पुणेकर घराबाहेर पडले नाहीत.
गेल्या तीन-चार दिवसांपासून शहराचे तापमान ३९ अंशाच्या घरात राहिले आहे. त्यामुळे पुण्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. दुपारी शहरात फिरताना उन्हाचे चटके बसत असल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाचे कमाल तापमान आज ३८.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानही चढेच आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाचे किमान तापमान २०.८ अंश तर लोहगाव येथील किमान तापमान २२.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे रात्रीही उकाडा जाणवत आहे.सुट्टीचा दिवस असल्याने अनेक पुणेकर खरेदीसाठी, फिरण्यासाठी बाहेर पडणे अपेक्षित होते. मात्र दिवसा उन्हाच्या कडाक्यामुळे अनेकजण घराबाहेरच पडले नाहीत. पुढील २४ तास शहराचे तापमान चढेच राहिल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)