‘प्रगत’ पुणे जिल्ह्यात इमारत नसल्याने डेअरी, व्यायामशाळेत अंगणवाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:27+5:302021-08-25T04:15:27+5:30
सुषमा नेहरकर-शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सर्वांत प्रगत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या व जिल्हा नियोजनचे सर्वाधिक साडेसहाशे ...
सुषमा नेहरकर-शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात सर्वांत प्रगत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या व जिल्हा नियोजनचे सर्वाधिक साडेसहाशे कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांत इमारत, जागा उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी अंगणवाडी चक्क अंगणवाडी सेविकेंच्या घरांमध्ये भरवली जात आहे. जिल्ह्यात आजही ४३५ अंगणवाड्यांना हक्कांच्या इमारती नसून, व्यायामशाळेत, दूधडेअरी, समाजमंदिर, शाळेच्या व्हरांड्यात अंगणवाडी भरवली जात आहे.
ग्रामीण भागात खेड्यापाड्यांत तळागाळातील मुलांना शिक्षणाची दारे खुली होण्यासाठी गावागावांत, वस्तीवर अंगणवाडी सुरू करण्यात आली. पुणे जिल्ह्यात लहान मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व लहान मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाड्यांचा मोठा वाटा आहे. पुणे जिल्ह्यात ४ हजार ६२१ अंगणवाड्या असून, आजही ४३५ अंगणवाड्यांना आजही हक्काची इमारत नाही. यामुळे या सर्व ठिकाणी अंगणवाड्या ग्रामपंचायत इमारत, मंदिर, खासगी जागेत, समाज मंदिर, शाळेच्या व्हरांड्यात, व्यायामशाळेत, सेविकेच्या घरांमध्ये अंगणवाडी भरवली जात आहे.
चौकट
या ठिकाणी चक्क अंगणवाडी सेविकेच्या घरात भरवली जाते अंगणवाडी
भोर तालुक्यातील कुंबळे, खानापूर, मावळ तालुक्यात शिवणेसह अन्य तालुक्यांतही काही ठिकाणी अशा प्रकारे अंगणवाडी सेविकेच्या घरांमध्ये अंगणवाडी भरवली जाते.
चौकट
चार-पाच वर्षांत अंगणवाड्यांसाठी कोट्यवधीचा निधी
चार-पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा स्थिती अधिकच गंभीर होती. यामध्ये शंभर-दीडशेपेक्षा अंगणवाड्या तर चक्क उघड्यावर, झाडांखाली भरविल्या जात होत्या. परंतु जिल्हा नियोजन समितीमधून दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आला. तरी देखील आजही ४३५ अंगणवाड्यांना स्वतः च्या इमारती नाही.
चौकट
यंदा ११ कोटी ९० लाख अंगणवाडी बांधकामासाठी
“राज्यात जिल्ह्यात कोरोनाचे संकट असताना देखील यंदा विविध विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळेच यंदा एकाच वर्षात १३८ अंगणवाड्यांचा बांधकामांसाठी प्रत्येकी साडेआठ लाखप्रमाणे ११ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामांना नुकतीच मंजुरी दिली असून, लवकरच कामे सुरू होतील.”
- निर्मला पानसरे, जिल्हा परिषद अध्यक्षा
----
तालुक्यात या ठिकाणी नवीन अंगणवाड्या
आंबेगाव ९, बारामती ९, भोर १७, दौंड ११, हवेली ५, इंदापूर १४, जुन्नर १४, खेड २३, मावळ ११, मुळशी ३, पुरंदर ११, शिरूर ८, वेल्हा ३, एकूण- १३८
------