अर्धवट योजनांमुळे साहित्यांपासून अंगणवाड्या वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:47+5:302021-06-01T04:09:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्या परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत अनेक योजना अंगणवाड्यांसाठी राबविण्यात आल्या. मात्र, यातील अनेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्या परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत अनेक योजना अंगणवाड्यांसाठी राबविण्यात आल्या. मात्र, यातील अनेक योजना या अर्धवट स्वरूपात राबविण्यात आल्या. काही मोजक्याच अंगणवाड्यांना साहित्यांचा लाभ मिळाला तर काही अंगणवाड्या वंचित राहिल्या. आजही अनेक अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. त्यांना पाणीपुरवठा नाही. तर वीजजोड नसल्याने त्या अंधारात आहेत. मग, अशा योजना राबवण्याचा फायदा काय, असे प्रश्न उपस्थित करत विरोधी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. यावर यापुढे सर्व अंगणवाड्यांना लाभ मिळेल याची काळजी घेतली जाईल. तसेच सदस्यांनी आपल्या परिसरातील असुविधा असणाऱ्या अंगणवाड्यांची माहिती जिल्हा परिषदेला द्यावी, असे आदेश अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिल्या.
जिल्ह्यात ४ हजार ६०० अंगणवाड्या आहेत. त्यातील ३ हजार ६०० अंगणवाड्यांना स्वत:ची जागा आहे. मात्र, अद्यापही अनेक अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. २०१७ पासून काहींचे बांधकाम रखडले आहे. अंगणवाड्यांना साहित्य ठेवण्यासाठी कोठ्या देण्यात आल्या. मात्र, त्या मोजक्याच अंगणवाड्यांना मिळाल्या. आपल्या योजना इतरांपुढे आदर्श राहिल्या आहे. मात्र, या प्रकारच्या कार्यामुळे आपली प्रतिमा मलिन होत आहे असा आरोप सदस्य शरद बुट्टे पाटील आणि आशा बुचके यांनी केला. तसेच सर्व अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत हवी आणि त्यांची देखभाल दुरुस्ती व्हावी. त्यांना पाणी आणि वीजजोड उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली.
यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, या प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. काही अंगणवाड्यांना वीजजोड नाही तर जागेअभावी अंगणवाड्या खाजगी जागांत आहे. ग्रामपंचायतींना या अंगणवाड्यांच्या साहित्यांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. देखभाल दुरुस्तीसाठी १२ कोटी ग्रामपंचायतींकडे आज उपलब्ध आहेत. येत्या काळात अंगणवाड्यांना इमारती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांची कामे तातडीने करायची आहेत, त्यांचे अर्ज आम्हाला द्या, असेही प्रसाद म्हणाले.
यावर अध्यक्षा पानसरे म्हणाल्या, सदस्यांनी आपल्या परिसरातील नादुरुस्त अंगणवाड्या, नळजोड तसेच वीजजोड नसणाऱ्या अंगणवाड्यांची माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी, त्याची तातडीने दुरुस्ती केली जाईल.