...त्यांच्यासाठी डॉक्टरच बनले देवदूत
By admin | Published: March 31, 2017 02:32 AM2017-03-31T02:32:14+5:302017-03-31T02:32:14+5:30
मागील काही दिवसांमध्ये डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमधील वादावर मोठा गोंधळा झाला. राज्यभरातील
रवीकिरण सासवडे / बारामती
मागील काही दिवसांमध्ये डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमधील वादावर मोठा गोंधळा झाला. राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीबाबत संपही केला. मात्र, बारामतीत घडेलेल्या एका घटनेमुळे डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाइकांमधील आपुलकीचे नातेदेखील उजेडात आले. उपचारांसाठी कोणताही खर्च न घेता बाळाला आणि त्यांच्या आईला येथील डॉक्टरांनी नवजीवन दिले.
भिगवण स्टेशन येथे राहणारे दत्तात्रय रामचंद्र शालघर यांचा हातगाड्यावर आइस्क्रीम विक्रीचा व्यावसाय आहे. त्यांची मुलगी नलिनी अनिल बुलबुले हिची बारामती येथील महिला शासकीय रुग्णालयामध्ये रविवारी (दि. २६) प्रसूती झाली. येथील डॉ. गणेश श्रीरामे यांनी त्यांच्यावर उपचार केले. नलिनी यांना मुलगा झाला; मात्र बाळाला ताप आल्याने अतिदक्षता विभागात ठेवणे आवश्यक होते. डॉ. श्रीरामे यांनी बारामती येथील डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा यांच्याशी संपर्क साधून बाळाच्या प्रकृतीची कल्पना दिली. तसेच, बाळाच्या नातेवाइकांची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत असल्याचे सांगितले. डॉ. मुथा यांनीदेखील बाळाला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. यादरम्यान नलिनी यांना रिक्षामधून घेऊन येताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. श्रीराम गल्ली बारामती येथील विशाल चव्हाण व नितीन चव्हाण यांनी तातडीने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. या दोघांनी त्यांच्या औषधोपचाराचाही खर्च दिला. नलिनी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डॉ. सौरभ मुथा यांच्या रुग्णालयात बाळाजवळ आणले. नलिनी यांचे वडील दत्तात्रय शालघर मुलीजवळ थांबून होते. मदतीसाठी दुसरे कोणी नातेवाईक नाहीत. तसेच, शालघर यांची पत्नी व नलिनी यांची आई अपंग असल्याने त्याही रुग्णालयात येऊ शकत नव्हत्या. यादरम्यान बाळाच्या औषधोपचारांचा खर्च कमी करून व बाळाच्या आईसाठीच्या जेवणाची व्यवस्था डॉ. मुथा यांनीच केली. बाळ बरे झाल्यानंतर बिल न घेता त्याला गुरुवारी घरी सोडले. त्यांना प्रवासखर्चही देण्यात आला. बाळाला घरी घेऊन जाताना मात्र नलिनी यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
यादरम्यान रुग्णालयातील दूरध्वनीवर डॉक्टरांना धमकीवजा फेन येऊ लागले. ‘‘बुलबुले पेशंट कुठे आहे. तुम्ही तिथे काय करता?’ अशा पद्धतीने फोनवरील व्यक्ती धमकावत होती. मात्र, त्याच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा यांनी उपचार सुरू ठेवले. फोनवरील नराधमांनी या घटनेसंबंधी व्हिडीओ सोशल मीडियावरून वायरल केला. मात्र, कोणालाही न जुमानता डॉ. राजेंद्र मुथा यांनी बाळावर उपचार सुरू ठेवले.