निरेतील रुग्णवाहिका चालक बनलाय देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:53+5:302021-04-06T04:10:53+5:30
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सहा गावातील तसेच नीरा परिसरातील इतर तालुक्यातील १ हजार ४८५ ज्येष्ठांना गेली महिनाभरात ...
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सहा गावातील तसेच नीरा परिसरातील इतर तालुक्यातील १ हजार ४८५ ज्येष्ठांना गेली महिनाभरात कोरोनाची लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेत रुग्णवाहिका चालक सचिन ननवरे यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे. दररोज तीन गावातुन सुमारे १०० ज्येष्ठांना गावातून नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून लसीकरणानंतर पुन्हा घरपोच सेवा देत आहेत.
६० वर्षे पुढील ज्येष्ठ नागरिकांचे तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण मोहीम सुरू आहे. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत नीरा सह गुळुंचे, कर्नलवाडी, पिंपरे (खुर्द), थोपटेवाडी, मांडकी ही गावे येतात. तालुक्यातील एका ही खेडेगावातून सध्या एस.टी.बसची सेवा सुरु नाही. या गावातील ज्येष्ठांना लसीकरणासाठी खेडेगावातून नीरा शहरात येण्यासाठी वाहनांची सोय नाही. परिणामी ज्येष्ठांना प्रवासासाठी हाल होत आहेत.
मागील वर्षी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या सहा गावांतील ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातील निधीतून एक रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली. सध्या याच रुग्णवाहिकेतून ज्येष्ठांना येण्या - जाण्यासाठी सोय करण्यात आली आहे. वाहन चालक सचिन ननवरे हे गेली आठवडाभर सकाळी मांडकी नंतर गुळुंचे, कर्नलवाडी, थोपटेवाडीतील ज्येष्ठांना लसीकरणासाठी घेऊन येत आहेत. या गावातील आशासेविका रुग्णवाहिका येण्या-आधी ज्येष्ठांना कल्पना देत आहेत. यावेळेत गावातील पारावर किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर ज्येष्ठ जमतात.
प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी नऊ वाजता लसीकरण सुरू होते, ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालते. यावेळेत ग्रामीण भागातील ज्येष्ठांसह आता ४५ वर्षां पुढील लोकही मोठ्यासंख्येने लसीकरण करुन घेत आहेत. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका अनिता नेवसे व शुभांगी चव्हाण यांनी लस दिली, आॅनलाईन तपासणी आशा सुपर्वायझर शुभांगी रोकडे, संगम कर्वे करत आहेत. आशासेविका स्वाती गायकवाड, मनिषा निगडे, आशा सुर्यवंशी, शाहिण बागवान, निशा पवार, लता पवार या नोंदी घेत आहेत. निरीक्षण कक्षात शिवाजी चव्हाण, सचिन ननवरे हे काम करतात तर सुपरवायझर आरोग्यसहायक बेबी तांबे आहेत.