ओतूरच्या सारथ्य फाउंडेशन संस्थेचे प्लाझ्मादूत ठरले देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:10 AM2021-05-06T04:10:10+5:302021-05-06T04:10:10+5:30
ओतूर: येथील निवडक युवकांची मिळून तयार झालेली सारथ्य फाउंडेशन ही संस्था कोरोनाच्या महामारी काळात रुग्णाच्या मदतीला ...
ओतूर: येथील निवडक युवकांची मिळून तयार झालेली सारथ्य फाउंडेशन ही संस्था कोरोनाच्या महामारी काळात रुग्णाच्या मदतीला २४ तास सेवा देत रुग्णाला प्लाझ्मा मिळवून देणारी राज्यात अव्वल ठरली आहे. गरीब, श्रीमंत, जात, पात, धर्म याची कोणतीही बाजू न मांडता मानवता या एकाच धर्माचे पालन करीत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून प्लाझ्मा मिळण्यासाठी फोन येताच ओतूरच्या सारथ्य फाउंडेशन संस्थेचे पदाधिकारी व सदस्य फोन करणाऱ्या व्यक्तीकडून रुग्णाची संपूर्ण माहिती संकलित करून त्यास गरजेनुसार त्वरेने प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याचे सत्कार्य गेल्या महिनाभरापासून करीत आहे. संस्थेने सर्व भागातील रुग्ण वाचविण्याचा ध्यास घेतला असून, अद्यापपर्यंत शेकडो रुग्णांना मोफत प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात ही संस्था यशस्वी झाल्यामुळे व रुग्णांचे वेळीच प्राण वाचविण्यात यश मिळत असल्यामुळे उत्साहाने या कार्यात संस्थेचे सुमारे ६० सदस्यांनी स्वतःला झोकून दिलेले आहे. युवकांनी जुन्नर तालुक्यात पहिले प्लाझ्मा हेल्थ डेस्क ओतूर येथे स्थापन केले असून फक्त नावासाठी नव्हे, तर फक्त माझ्या देशातील मानव हा या महामारीतून बचावला पाहिजे ही एकच भावना संस्थेच्या प्रत्येक सदस्यांच्या नसानसात भिनलेली पाहायला मिळत आहे.
प्लाझ्मा मिळवून देताना या सदस्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असून प्लाझ्मा दात्यास नम्र विनंती, वेळेची बचत, रुग्णांच्या प्राणाचे महत्त्व, आर्थिक बाबी, प्रवास, रुग्णाची संपूर्ण माहिती संकलन, संगणकावर टिप्पणी करणे व २४ तास भ्रमणध्वनीवर जागता पहारा ठेवून त्या त्या रुग्णाला प्लाझ्मा जागेवर पोच होईपर्यंतची संपूर्ण खबरदारी घेणे अशी सर्व कामे पार पाडली जात आहेत. यासाठी ओतूर येथे संगणकीकृत एक कार्यालय उघडण्यात आले असून त्यावर प्लाझमाचे गरजवंत रुग्ण व प्लाझ्मा दाते यांची संपूर्ण सविस्तर माहिती संकलित केली जात आहे. प्लाझ्मा दात्यास अत्यंत नम्रपणे प्लाझ्मा दान करण्यास प्रवृत्त केले जात असून, मानवतेचा धर्म सर्व धर्मात महान धर्म असल्याचे त्यांच्या मनावर बिंबविण्याचा अहोरात्र प्रयत्न सारथ्यचे पदाधिकारी व सदस्य करीत आहेत.
कार्यालय प्रमुख प्रथमेश तांबे, प्रमोद बोडके, विजय गाढवे, ओंकार रसाळे, सागर गाढवे, सागर बुट्टे, सागर मांडे व सर्व सदस्य मार्गदर्शक सुधाकर डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र मोफत परिश्रम घेत आहेत.
सारथ्य फाउंडेशनचे कार्यालय व सदस्य