संगणकामुळे बदलेल दिव्यांगांचे आयुष्य
By admin | Published: April 19, 2016 12:49 AM2016-04-19T00:49:47+5:302016-04-19T00:49:47+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये संगणकात नानाविध प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग विशेष मुलांसाठीही होत आहे. संगणकाचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून दिव्यांग
पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये संगणकात नानाविध प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग विशेष मुलांसाठीही होत आहे. संगणकाचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून दिव्यांग मुलांच्या कारकिर्दीला प्रोत्साहन मिळत आहे. दिव्यांगांची प्रतिभा आपल्याला शोधून काढायची आहे. त्यांच्यातील विशेष नैपुण्य मिळवून त्याचा संगणकाशी संबंध जोडला जाऊ शकतो का, याबाबत संशोधनाची गरज आहे. भविष्यात संगणकामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला.
संगणकतज्ज्ञ आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या उत्कर्ष प्रकाशननिर्मित ‘दिव्यांग संगणक’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. आपटे प्रशालेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास संजय गांधी, दिलीप देशपांडे, गौरी शिकारपूर, सु. वा. जोशी, अभय आपटे उपस्थित होते.
डॉ. भटकर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत संगणकाने क्रांतीचा उच्चांक गाठला आहे. सुपर कॉम्प्युटरमध्ये क्रांती होत असताना ती मर्यादित लोकांपर्यंतच सीमित राहील का, असा प्रश्न मनात निर्माण झाला होता. मात्र, संशोधनामुळे ही भीती राहिलेली नाही. विशेष मुलांना उभारी देण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांची गरज आहे.’’
संजय गांधी म्हणाले, ‘‘सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना कारकिर्दीच्या विविध वाटा चोखाळण्याची संधी दिली जात आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत त्यांना स्मार्टफोन रिपेअरिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर अशा अभ्यासक्रमांच्या माध्यमातून करिअरला प्रोत्साहन मिळू शकते. निश्चय, निरंतर प्रयत्न, निर्णयक्षमता आणि निराशेवर मात या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते.’’
अभय आपटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भारती डोळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)