कोरोना काळात समाजासाठी मदतीला धावले देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:49+5:302021-04-27T04:11:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’....ही उक्ती वास्तवात सिद्ध करीत, कोरोनाच्या संकटकाळात स्वत:च्या जिवाची ...

Angels ran to help the community during the Corona period | कोरोना काळात समाजासाठी मदतीला धावले देवदूत

कोरोना काळात समाजासाठी मदतीला धावले देवदूत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’....ही उक्ती वास्तवात सिद्ध करीत, कोरोनाच्या संकटकाळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता समाजातील अनेक व्यक्ती, सामाजिक संघटना पुणेकरांच्या मदतीला धावून आल्या आहेत. कुणी प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी धडपडतंय...कुणी व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन, रुग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतंय...तर कुणी अगदी धर्माच्या भीती ओलांडत अंत्यसंस्कार करून देण्याची सेवा बजावतंय....गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे जे युद्ध सुरू आहे.. त्यात डॉक्टर, परिचारकांसारख्या अनेक योद्धयांबरोबरच एक समाज घटक देखील लोकांसाठी जणू ‘देवदूत’ म्हणून काम करीत आहे. ना कौतुकाची अपेक्षा ना प्रसिद्धीचा मोह. निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वांसमोरच आदर्श निर्माण केला आहे.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयात बेड नाहीत, ना व्हेंटिलेटर, ना इंजेक्शन..त्यामुळे सारेच हवालदिल झाले आहेत. प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज आहे. कुटुंबातील एक किंवा दोन व्यक्ती या गोष्टी मिळविण्यासाठी हतबल ठरत आहेत. अशा वेळी गरजू लोकांच्या मदतीला काही सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटना धावून आल्या आहेत. प्लाझ्मा, रक्तदानासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. आजमितीला वैद्यकीय क्षेत्रासह महापालिकेच्या सर्व यंत्रणांवर ताण आला आहे. तो कमी करण्यासाठी सर्वजण खारीचा वाटा उचलत आहेत. तरुणाईही त्याला अपवाद ठरलेली नाही. समाजाच्या आणि गरजू व्यक्तींकरिता तरुणाईने पुढाकार घेतला आहे. जवळच्या व्यक्तींना मदत करण्यासाठी युवा पिढी सरसावली आहे. कोरोनाची लढाई एकट्यादुकट्याची नाही तर ती मिळून लढायची आहे. तरच त्यावर मात करण्यात यश मिळेल याचा प्रत्यय शहरात अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे काहीप्रमाणात यंत्रणेवरचा ताण हलका होण्यास मदत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

--------------------------------------------------------------------------------

आम्ही प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करतो. त्यातून दाते मिळतात. एखाद्या रुग्णाला आपत्कालीन स्थितीमध्ये रक्ताची पिशवी मिळवून देतो. बेड्स, इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे कामही केले. आता नवीन उपक्रम सुरू करीत आहोत. पाटील इस्टेटसह शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन त्या लोकांचे शारीरिक तापमान आणि आॅक्सिजन पातळी चेक करणार आहोत. ज्यांना लक्षणे दिसत आहेत त्यांना कोरोना टेस्ट करायला सांगणार आहोत. सर्वजण आॅक्सिजन पातळी कमी झाल्यावर बेड लागेल तेव्हा काम करीत आहेत. पण, रुग्ण वाढणार नाहीत यासाठी महापालिका किंवा कुणीच काम करीत नाही. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह येत आहेत आणि त्यातून मृत्यूदर वाढत आहे. आम्ही उद्यापासून जास्त गर्दीच्या ठिकाणी राहाणा-या लोकांचे टेस्टिंग करणार आहोत. आमचे काम नगर, पुरंदर तालुक्यातही सुरू आहे. शनिवारपेठेतील द सावली अभ्यासिका येथे प्लाझ्मा दानासाठी कार्यालय सुरू करीत आहोत. ज्यांना प्लाझ्मा हवाय किंवा दाते व्हायचंय त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा - सायली धनाबाई, सावली फौंडेशन

-------------------------------------------------------------------------------------------------------

सध्या वैकुंठ स्मशानभूमीवर ताण आला आहे. अनेक कोरोनाने निधन पावलेल्यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. आमच्या संस्थेने त्यांचे अंत्यसंस्कार करून देण्यासाठी पुढाकार घेतला असून, सदाशिव पेठेतील स्मशानभूमीत एक जागा मागून घेतली आहे. ससूनला २८ पार्थिव अशी होती ज्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. मग आम्ही त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसापासून हिंदू धर्मपद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यास आम्ही सुरूवात केली. पण कुणीही आक्षेप घेतला नाही. पुणे कोरोनाने धगधगत आहे. या परिस्थितीत कुणी जातीपातीच राजकारण करता कामा नये. आत्तापर्यंत ३०० हिंदूंच्या पार्थिवावर संस्थेने अंत्यसंस्कार केले आहेत. - जावेद खान, उन्मत संस्था

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Angels ran to help the community during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.