नितीन गडकरी यांच्यावर अँजिओप्लास्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:14 AM2020-04-25T05:14:19+5:302020-04-25T05:17:57+5:30
प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांनी त्यांच्यावर उपचार केले.
- विशाल शिर्के
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हृदयावर सुमारे चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमधे गुठळ्या आढळल्याने स्टेंट (एक प्रकारची जाळी) बसविण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी दैनंदिन कामकाजाला सुरुवात केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत, त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. तसेच, लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या. रुग्णालयातून घरी परतल्यावर गडकरी यांनी निवासस्थानातूनच दैनंदिन कामकाजास सुरुवात केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी ते संवाद साधत आहेत. विरंगुळा म्हणून चित्रपट पाहण्याबरोबरच चित्रपट गीतांचा आस्वादही ते घेत आहेत. या शिवाय नातवंडांबरोबर देखील ते वेळ घालवत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
हृदयाकडे रक्त वाहून नेणाºया रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले तर तो अडथळा दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. याची पूर्व तपासणी अँजिओग्राफीद्वारे केली जाते.