संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:14 AM2021-08-15T04:14:58+5:302021-08-15T04:14:58+5:30

संतप्त शेतकऱ्यांनी घातला महावितरण अधिकाऱ्यांना घेराव संतप्त शेतकऱ्यांनी घातला महावितरण अधिकाऱ्यांना घेराव थकीत बिलांमुळे वीजजोड तोडली; मुदतवाढ ...

Angry farmers surround MSEDCL officials | संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

Next

संतप्त शेतकऱ्यांनी घातला महावितरण अधिकाऱ्यांना घेराव

संतप्त शेतकऱ्यांनी घातला महावितरण अधिकाऱ्यांना घेराव

थकीत बिलांमुळे वीजजोड तोडली; मुदतवाढ द्या, वीजजोड तोडल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगवी : कृषी पंपासह सर्वच वर्गवारीतील थकबाकी असणाऱ्या ग्राहकांच्या वीजजोड तोडण्याच्या आदेशानंतर सांगवी, शिरवली, खांडज, कांबळेश्वर येथील वीजजोड तोडण्याच्या कारवाई विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. संतप्त शेतकरी आणि महावितरणचे कर्मचारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली.

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने बारामती परिसरात पाठ फिरवली आहे. परिणामी खरीप पिकावर मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे पीक पाण्याअभावी जळून चालले आहे. उसाची पिकेदेखील आता जळण्याच्या मार्गावर आहेत. सुदैवाने धरण परिसरात झालेल्या पावसामुळे नदीला चांगल्याप्रकारे पाणीसाठा आहे. परंतु शेतकऱ्यांची थकबाकी असल्याने ट्रान्स्फॉर्मर सोडवल्यामुळे पाणी असूनही शेतकरी हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शनिवारी सांगवी येथील महावितरणचे कार्यालय गाठले. थेट अधिकाऱ्यांना घेराव घातला. सरकारने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी योजनेत शेतकरी सहभागी होण्यास तयार आहेत. या योजनेत सहभागी होण्याची मुदत मार्च २०२२ आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्यामुळे विद्युत अधिकारी यांना अपेक्षित असलेली थकीत रक्कम देण्यासाठी शेतकरी असमर्थ आहेत. यामुळे उसाची तोडणी होईपर्यंत किंवा सोयाबीनचे पीक निघेपर्यंत महावितरणने मुदत वाढ द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्यामुळे आम्ही मुदत वाढ देण्यासाठी असमर्थ असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातून शेतकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या शाब्दिक संघर्ष झाला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला. परंतु शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते. जर यापुढेदेखील विद्युत वीजजोड तोडची भूमिका अशीच राहिली तर उग्र आंदोलन, रास्ता रोको व उपोषण या मार्गाचा अवलंब करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष राहुल तावरे, हनुमंत तावरे, दत्तात्रय तावरे, विरेंद्र तावरे, दत्तोबा ढाकाळकर, अरविंद तावरे,विठ्ठल फडतरे, विराज खलाटे, धनंजय खलाटे, इंद्रसेन आटोळे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळी : सांगवीत संतप्त शेतकऱ्यांकडून महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Angry farmers surround MSEDCL officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.