संतप्त नीरादेवघर धरणग्रस्तांनी पाणी रोखले
By admin | Published: November 23, 2015 12:54 AM2015-11-23T00:54:53+5:302015-11-23T00:54:53+5:30
नीरादेवघर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंर्दभात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने रविवारी नीरादेवघर धरणातून सिंचनासाठी खाली सोडलेले
भोर : नीरादेवघर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंर्दभात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने रविवारी नीरादेवघर धरणातून सिंचनासाठी खाली सोडलेले पाणी व सुरू असलेले उजव्या कालव्याचे काम नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन शेतकरी संघटनेने बंद केले. आक्रमक झालेल्या धरणग्रस्तांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला आहे.
सकाळी आठ वाजता पाटबंधारे विभागाकडून नीरादेवघर धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले होते. ते पाणी नीरा नदीने आपटी गावापर्यंत आल्यावर धरणग्रस्तांच्या लक्षात आल्यावर संघटनेचे अध्यक्ष बाळासोा मालुसरे, चिमण शिरवले, हनुमंत कंक, लक्ष्मण धामुणसे, किसन दिघे, नथू दिघे यांनी धरणातून सोडलेले पाणी बंद केले. आमच्या मागण्यांची पूर्तता करा, मगच पाणी खाली सोडा, अशी मागणी त्यांनी केली.
२६ आॅक्टोबरला विविध मागण्यांसाठी नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने धरणावर काम बंद आंदोलन करण्यात आले. त्या वेळी पाटबंधारे विभागाकडून मागण्यांसंदर्भात ५ नोव्हेंबरला पुण्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी व संबंंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे लेखी कार्यकारी अभियंता पवार यांनी दिले.
त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र ती बैठक झालीच नाही. ती पुढे ढकलून १९ नाव्हेंबर तारीख देण्यात आली. तीही बैठक झाली नाही.
वीस वर्षांपासून नीरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. धरणग्रस्तांची फसवणूक झाली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.