आधार नोंदणीच्या कारभारावर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 07:22 AM2017-12-05T07:22:00+5:302017-12-05T07:22:09+5:30
आधार नोंदणीसाठी गेल्यानंतर टोकन देऊन थेट सहा महिन्यांतरची तारीख दिली जाते. आठ-दहा तास रांगेमध्ये उभे राहावे लागते. अनेक भागात आधार नोंदणीच्या मशिनच उपलब्ध नाहीत.
पुणे : आधार नोंदणीसाठी गेल्यानंतर टोकन देऊन थेट सहा महिन्यांतरची तारीख दिली जाते. आठ-दहा तास रांगेमध्ये उभे राहावे लागते. अनेक भागात आधार नोंदणीच्या मशिनच उपलब्ध नाहीत. ज्येष्ठ नागरिकांची बोटांचे ठसे उमटत नसतील, तर नोंदणी केली जात नाही, आॅपरेटरकडून नागरिकांना अरेरावेची भाषा वापरली जाते, यासारख्या तक्रारींचा पाढा वाचत लोकप्रतिनिधी व सदस्यांनी सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या आधार नोंदणीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. केंद्र व राज्य सरकारने विविध कामांसाठी आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शहर आणि जिल्ह्यात आधार नोंदणीसाठी नागरिकांना रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे.
जिल्हा प्रशासनाकडे नादुरुस्त असलेल्या १३० मशिन दुरुस्त करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून मिळाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सोमवारी दिली.
विधानभवनातील विभागीय कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्या वेळी सदस्यांनी जिल्हा आणि शहरात किती आधार केंद्र सुरू आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना राव बोलत होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे उमटत नाहीत, त्यांच्या फक्त डोळ्यांचे स्कॅनिंग करून आधार उपलब्ध करून द्यावे, ज्येष्ठ नागरिक व आजारी नागरिकांसाठी घरपोच सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली.