अनिल भोसले यांच्यासह १६ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:16 AM2020-01-10T04:16:29+5:302020-01-10T04:16:36+5:30
तब्बल ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार ७२३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आमदार अनिल भोसले यांच्यासह १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे़
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील रोख रक्कमेत तब्बल ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार ७२३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आमदार अनिल भोसले यांच्यासह १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे़
आमदार भोसले, शहाजीराव रनावडे, हनुमान सोरते, सूर्याजी जाधव, विष्णु जगताप, नगरसेविका रेश्मा अनिल भोसले, सुरेखा भन्साली, नितीन तुपे, विजय अल्हाट, लक्ष्मण गिते, प्रकाश जंगम, हनुमंता हुस, विश्वास गौंदूर, श्रीकांत कुलकर्णी, श्रीकृष्ण कुलकर्णी, तानाजी पडवळ, शैलेश भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी चार्टर्ड अकांऊटंट योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ अधिक तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़
अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत़ मात्र, दोन वर्षापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांची पत्नी रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता़ मात्र, पक्षाचा अर्ज बाद ठरल्यानंतर त्या भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून महापालिकेवर निवडून आल्या आहेत़ अनिल भोसले हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी ते पक्षात सक्रीय नाहीत़
>असे झाले ७१ कोटी गायब
बँकिंगची कोणतीही सेवा नसलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या मुख्यालयामध्ये पैसे वर्ग केल्याचे दाखवून तब्बल ७१ कोटी ७८ लाख ८८ हजार रुपये गायब केल्याचे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या तपासणीत समोर आले आहे. या पैशाचा हिशेबही बँक व्यवस्थापनाने आरबीआयच्या अधिकाऱ्यांना दाखविलेला नाही.
हा व्यवहार १६ एप्रिल २०१९ रोजी झाल्याची नोंद बँकेने केली आहे. आरबीआयने मार्च २०१७ आणि मार्च २०१८ या वर्षातील ताळेबंदाची देखील तपासणी केली आहे. त्यात बँकेतील अनुत्पादक खात्यातील (एनपीए) रक्कम २३२ कोटी ७७ लाखा वरुन (५८.७० टक्के) ३१४ कोटी ९८ लाख रुपयांवर (८६.२० टक्के) पोहोचली आहे. या कारणांमुळे बँकेचा परवाना रद्द करुन दिवाळखोरीची (लिक्विडेशन) कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस आरबीआयने २४ आॅक्टोबरला बजावली आहे.