पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वन क्षेत्रातील प्राणीगणना रद्द; मात्र भीमाशंकर अभयारण्यातील होणार
By श्रीकिशन काळे | Published: May 5, 2023 12:49 PM2023-05-05T12:49:25+5:302023-05-05T13:00:21+5:30
दरवर्षी देशातील अनेक अभायरण्यांमध्ये बुद्धपोर्णिमेला प्राणी गणना करण्यात येत असून बुद्धपोर्णिमेच्या रात्री जंगलात लख्ख प्रकाश असतो
पुणे : दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला वन विभागाकडून प्राणीगणना केली जाते. परंतु यंदा मात्र ती रद्द करण्यात आली आहे. परंतु अभयारण्यातील प्राणी गणना आज रात्री होणार आहे. केवळ वन क्षेत्रातील गणना होणार नाही. कारण तिथे पाऊस आणि ढगाळ वातावरणाचे सावट आहे. पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी ही माहिती 'लोकमत'ला दिली. ढगाळ वातावरण असल्यामुळे प्राणी गणना करण्यात अडचणी येतात आणि योग्यप्रकारे गणना होत नाही. म्हणून वन विभागाच्या वतीने उघड्या वन क्षेत्रातील गणना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्षभराच्या काळात अभयारण्यामध्ये प्राण्यांची संख्या किती वाढली आणि किती कमी झाली, याची माहिती घेण्यासाठी प्राण्यांची गणना करण्यात येत असते. याशिवाय अभयारण्यात जर मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राण्यांवर काही परिणाम झाला आहे का, हे देखील अधिकाऱ्यांकडून तपासले जाते. गेल्या महिन्याभरापासून विदर्भामध्ये आणि राज्यात इतर ठिकाणी देखील होत असलेल्या पावसामुळे प्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. मात्र आज रात्री पाच मे रोजी भीमाशंकर अभयारण्यात प्राणी गणना केली जाणार आहे. अनेक जणांना या गणनेत सहभागी होतात. त्यांना गणनेचा आनंद घेता येतो.
दरवर्षी देशातील अनेक अभायरण्यांमध्ये बुद्धपोर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना करण्यात येते. बुद्धपोर्णिमेच्या रात्री जंगलात लख्ख प्रकाश असतो, त्यावेळी वनविभागाचे अधिकारी पाणवठ्यावर बसून प्राण्यांची मोजणी करतात. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या प्राणी गणनेचं प्राणीप्रेमींना मोठे आकर्षण असते.
''भीमाशंकर अभयारण्यात आज रात्री प्राणी गणना होईल. परंतु उघड्या वन क्षेत्रातमध्ये ती रद्द केली आहे. तिथे पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. - एन. आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक, पुणे वन विभाग''
''आमच्या जुन्नर परिसरात आज रात्री गणना होईल. अजून तरी आम्हाला रद्द झाल्याचा आदेश आलेला नाही. पण काल जुन्नरला पाऊस झाला आणि आज देखील ढगाळ वातावरण आहे. आज गणना झाली नाही तर मग पुढच्या वर्षीच् करावी लागते. - रमेश खरमाळे, वनरक्षक, जुन्नर वन विभाग''