पुणेकर प्राणीमित्रानं मन जिंकलं; स्वतःच्या कलाकृती विकून रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांना जगवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 12:49 PM2020-06-02T12:49:36+5:302020-06-02T13:11:04+5:30
घराच्या गेटपासून ते अगदी बेडरुम,हॉल, स्वयंपाकघर असं कुठेही पाहिले तरी तिथे मुक्त संचार करताना श्वान पाहायला मिळतील.
दीपक कुलकर्णी-
पुणे : कोरोनामुळे माणसाला माणूस विचारेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांची अवस्था सध्याच्या काळात किती भयानक असेल याची कल्पना न केलेली बरी. गेल्या काही दिवसांत महागडी श्वान, मांजरे यांना कोरोनाच्या भीतीमुळे एकतर रस्त्यावर तरी सोडले जात आहे किंवा विषारी ओषधे देत त्यांचे जीवन संपविण्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मात्र, एकीकडे ही परिस्थिती असली तरी दुसरीकडे याच रस्त्यावरच्या मुक्याजीवांसाठी स्वतःच आयुष्य पणाला लावत त्यांची काळजी घेणारे पण कुणीतरी असणारच ना.. हो आहेत.. त्यांनी रस्त्यावरच्या भटक्या श्वानांसाठी अन्नपाणी, निवारा, औषधोपचार खर्चाच्या व्यवस्थेसाठी आपल्या एकापेक्षा एक सरस कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. पुण्यातील कॅम्प परिसरात राहणाऱ्या निनाद गिडवाणी नावाच्या संशोधक 'प्राणीमित्र' माणसाची ही कथा...
गेल्या ३० वर्षांपासून निसर्ग, पर्यावरण आणि मानवी जीवनशैली यांची सांगड घालण्यासाठी गिडवानी हे नानाविध अभिनव प्रयोग करत आहे. याच विलक्षण प्रयोगातून जागतिक व राष्ट्रीय पातळीवरचे असे एकूण १९ पेटंट त्यांच्या नावावर जमा आहे. त्यांच्या या पेंटटमध्ये पाठीच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत तयार केलेली लाकडी खुर्ची, नैसर्गिक घटकांचा वापर करुन इंधनाची पुरेपूर बचत करणारी स्वयंपाकाची शेगडी, वेगवेगळी स्वयंपाकाची भांडी, वषार्नुवर्षे टिकणारे दिवे अशा गोष्टींचा समावेश आहे. तसेच गिडवाणी यांच्या भन्नाट कल्पनेतून साकारलेल्या एकापेक्षा एक सरस पेटिंग्स् ,मूर्त्या साकारल्या आहेत. त्यांच्या या अभ्यासपूर्ण संशोधन कायार्साठी भारत सरकारतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
कोणत्याही प्रकारच्या देणगीशिवाय निनाद गिडवानी हे आपल्या पत्नीसह 'भारत प्राणी सेवा केंद्र' या संस्थेमार्फत मुक्या प्राण्यांची सेवा करत आहे. त्यांनी रस्त्यावरच्या निराधार, अपघातग्रस्त, दुर्धर आजार जडलेल्या अशा ५० ते ५५ श्वानांना आपल्या कुटुंबात सामावून घेतले आहे. त्यांच्या घराच्या गेटपासून ते अगदी बेडरुम,हॉल, स्वयंपाकघर असं कुठेही पाहिले तरी तिथे मुक्त संचार करत श्वान पाहायला मिळतील. फक्त ते श्वानांच्या वयानुसार, वेगवेगळ्या प्रजातीनुसार त्यांची राहण्याची, अन्नपाण्याची,उपचाराची काळजी घेतात.
निनाद गिडवाणी म्हणाले, आयुष्यात ज्यावेळी गमावण्यासाठीच माझ्याकडे काहीच राहिले नव्हते. तेव्हा निसर्गाने मला जगण्यासाठीचा सर्वात महत्वाचा घटक असलेला प्राणवायू मोफत दिला. त्याच ऋणात राहून माणूस म्हणून जगताना निसर्ग, पर्यावरण आणि मानवी साखळी जपण्याचा प्रयत्न करतो आहे. इतके दिवस माझ्या कलाकृतींनी मला भरभरुन साथ दिली. त्यामुळे कुणाच्या मदतीशिवाय हे प्राणी सेवाकार्य सुरु होते. पण कोरोनामुळे माझ्या कलाकृतींना खरेदी करण्यासाठी गिऱ्हाईकच मिळेनासे झाल्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. रोजचा खर्च तर थांबत नाही. त्यात मुक्या प्राण्यांचे उपचार अतिशय महाग आहेत. तरी जे शक्य असते ते मी घरी करतो. पण अत्यावश्यक उपचारात दिरंगाई करता येत नाही. मात्र, ''राहो में रुकावटे, मुश्किले जरुर आयेगी मगर अच्छे कर्मो से डर नही दुआ मिलती है'' हे वाक्य बोलताना देखील समोरच्या श्वानांवरुन हात फिरवताना ते थोडेसे गहिवरले.
.......................
कोरोनामुळे खर्च भागवणे झाले बिकट
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक संकट उभे राहिल्याने अनपेक्षित उलथापालथ झाली. आमच्या संस्थेला देखील महिन्याला अन्नपाणी, आरोग्य उपचार यांसह लागणारा ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च आहे. शिवाय संस्थेत प्राण्यांच्या निगा राखण्यासाठी असलेले कामगार, तसेच कलाकृती घडविण्याच्या कामात मदतनीस म्हणून असणारे कारागीर असे अनेकजण येथे काम करतात, त्यांचे महिन्याचे वेतन आहेच. पूर्वी मुंबई, पुणे आदी ठिकाणी कलाकृतींच्या विक्रीच्या माध्यमातून तो खर्च निघत असत. पण आता सगळेच व्यवहार ठप्प असल्याने ऑनलाईन माध्यमांसह विविध पयार्यांचा विचार सुरु आहे.- निनाद गिडवाणी,भारत प्राणी सेवा केंद्र.