प्राण्यांचे होणार सन्मानपूर्वक दहन, महापालिकेतर्फे सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 02:12 AM2018-12-17T02:12:28+5:302018-12-17T02:13:54+5:30
महापालिकेतर्फे सोय : नायडू रुग्णालयाजवळ उभारले इन्सिनरेटर
येरवडा : शहरात मृत पावलेल्या प्राण्यांना दहन करण्यासाठी आता महापालिकेतर्फे खास व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ-मोठी जनावरे मृत झाल्यानंतर, त्यांच्या दहनाचा प्रश्न गंभीर होता; परंतु आता या सेवेमुळे तो प्रश्न सुटला आहे. सन्मानपूर्वक आता प्राण्यांचे दहन करण्यात येणार आहे.
मोठ्या मृत प्राण्यांच्या दहनासाठी महापालिकेने नायडू रुग्णालयाजवळ उभारलेल्या इन्सिनरेटरचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. नायडू रुग्णालयालगत विद्युत विभागाने हा इन्सिनरेटर उभारला आहे. या पूर्वी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत मृत प्राणी गोळा करून त्याची कारकस प्रकल्पात विल्हेवाट लावली जात होती. या प्रकल्पासाठी सुमारे १,९८,९७००० रुपये खर्च आला आहे. सदर प्रकल्पामध्ये ५०० ते ८०० किलोपर्यंतची ४ ते ५ मोठी मृत जनावरे जाळणे शक्य होणार आहे. मृत जनावरे उचलण्यासाठी २ टन क्षमतेची रिमोट कंट्रोल आॅपरेटेड क्रेन बसविण्यात आलेली आहे. मृत जनावर जाळल्यानंतर तयार होणाऱ्या धुरावर प्रक्रिया करण्यासाठी मिस्ट प्रकारचे नॉझल असणारे वॉटर स्क्रबर बसविण्यात आलेली आहे. स्क्रबमधून बाहेर पडणारा धूर हवेत सोडण्यासाठी ३० मीटर उंचीची चिमणी बसविण्यात आलेली आहे.
देशातील पहिलाच प्रकल्प
पुणे शहरात मृत पावणाºया मोठ्या जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे. यामुळे शहरात स्वच्छता राखण्यास व मृत जनावरांमुळे होणारी आरोग्यकारक परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे. या कामाकरिता गिरीश बापट यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प असून, मृत जनावरांचे सन्मानपूर्वक दहन होणार आहे.