जनावरांना चाराटंचाईतही मिळतो पौष्टिक आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:20+5:302021-06-01T04:08:20+5:30

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुधाळ जनावरांची संख्या मोठी असून, या जनावरांना पावसाळ्यामध्ये मुरघासाचा फायदा होत असतो. रब्बी हंगामामध्ये मोठ्या ...

Animals also get nutritious food in Charatanchai | जनावरांना चाराटंचाईतही मिळतो पौष्टिक आहार

जनावरांना चाराटंचाईतही मिळतो पौष्टिक आहार

Next

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुधाळ जनावरांची संख्या मोठी असून, या जनावरांना पावसाळ्यामध्ये मुरघासाचा फायदा होत असतो. रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो. जुन्नर तालुक्यामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणात चाऱ्याचे उत्पादन घेतले जाते. जनावरांना खाऊ घालूनही उरलेला हिरवा चारा मुरघास बनवण्यासाठी उपयोगी पडत आहे. मका, ज्वारी, हत्ती गवत इत्यादी चारापिकांचा मुरघासासाठी वापर केला जातो. हिरव्या चाऱ्याचे कुट्टी यंत्राच्या साह्याने लहान-लहान तुकडे करून त्यावर गूळमिश्रित पाणी व मिठाचे द्रावण टाकून ते बंद प्लास्टिकच्या पिशवीत हवाबंद केले जाते. हवाबंद पिशवीत साठवलेला हा चारा दोन ते तीन महिन्यांनंतर आवश्यकतेनुसार जनावरांना चाऱ्यासाठी उपयोगात आणला जातो. मुरघास तयार करताना सर्वोत्तम पौष्टिक स्थितीतील चारा वापरला जात असल्यामुळे त्याचे पौष्टिकमूल्य वाढते. हा चारा वर्षभर चांगल्या स्थितीत राहतो. वर्षभर हिरवा चारा साठवण्याचे नियोजन म्हणजे मुरघास होय. शेतकरी वर्षभर जनावरांना पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध करू शकत नाही; परंतु मुरघास बनवून ठेवल्यास वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो. मुरघास हा जनावरांना पचण्यास सोपा असून रुचकर व स्वादिष्ट असतो. त्यामुळे जनावरे तो वाया न घालवता चवीने खातात. जनावरांच्या दुधात देखील मुरघासामुळे वाढ होत आहे.

प्रतिक्रिया

उन्हाळ्यामध्ये मी मका पीक घेतले होते. या मका पिकाचा मी मुरघास बनवून ठेवला आहे. शेतीकामाच्या वेळेत, पावसाळ्यात, चाराटंचाईच्या काळात, जनावरांना पौष्टिक खाद्य म्हणून त्याचा मला वर्षभर उपयोग होणार आहे.

सोपान भोर, दूध उत्पादक शेतकरी, वडगाव कांदळी

मुरघासात तयार होणारे लॅक्‍टिक आम्ल हे गायी व म्हशीच्या पचनेंद्रियात तयार होणाऱ्या रसासारखे असते. म्हणून मुरघास हा पचनात सोपा असतो. मुरघासामुळे जनावरांची भूक वाढते. त्यांच्या चयापचयात बिघाड होत नाही. त्यामुळे दुधाची गुणवत्ता व उत्पादन वाढते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी मुरघास बनवितात.

डॉ. महेश शेजाळ, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, जुन्नर

वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील शेतकरी सोपान भोर यांनी तयार केलेल्या मुरघासाच्या पिशव्या.

Web Title: Animals also get nutritious food in Charatanchai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.