जनावरांनीच सावरले ‘बजेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:59 AM2017-08-13T03:59:18+5:302017-08-13T03:59:26+5:30
पावसाने मारलेली दडी, पिकांचे घटलेले उत्पादन अशी स्थिती असताना जनावरांनीच शेतकºयांचे बजेट सावरले आहे. दुग्ध उत्पादनासाठी जनावरांच्या मागणीत वाढ झाली आहे.
बारामती : पावसाने मारलेली दडी, पिकांचे घटलेले उत्पादन अशी स्थिती असताना जनावरांनीच शेतकºयांचे बजेट सावरले आहे. दुग्ध उत्पादनासाठी जनावरांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरदेखील ‘टाईट’ असल्याचा शेतकºयांचा आवाज बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे बाजार आवारात होता.
साधारणत: ६० हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत गाई, म्हशींच्या किमती गेल्या आहेत. याशिवाय शेळ्या, बोकड यांच्यादेखील किमती वाढल्या असल्याचे चित्र आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारात जनावरांचा स्वतंत्र बाजार भरतो. दुभती जनावरे विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांसाठी या बाजार आवारात चांगली सोय करण्यात आली आहे.
बारामतीसह सांगोला, बार्शी, कर्जत, चाकण, कोल्हापूर, इंदापूर, सोलापूर आदी भागांतील शेतकरी, व्यापारी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी बारामतीच्या बाजाराला पसंती देतात. मध्यंतरी केंद्र सरकारने जनावरे खरेदी-विक्रीवर प्रचंड निर्बंध आणले होते. त्याचा धसका शेतकºयांनीदेखील घेतला होता. मात्र, न्यायालयाने सरकारचा आदेश मोडीत काढला. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधान आहे.
याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारने सहकारी दूध संस्थांना दुधाचे दर २७ रुपये करण्याचे आदेश दिले आहेत. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मागील महिन्यात तसे आदेश दिल्याने सहकारी दूध संस्थांनी दरात वाढ केली आहे. त्यामुळे पाऊसकाळ लांबला असला तरी दुष्काळी पट्ट्यात दुग्ध उत्पादनावर अवलंबून असणारा शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे धरणपट्ट्यात पाऊस चांगला आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर, दौंडसह अन्य भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेती खरीप हंगाम अडचणीत आला. परंतु, धरणाचे पाणी सोडल्यामुळे शेती तरारली आहे. याच पार्श्वभूमीवर आज
बारामतीच्या बाजारात जनावरांच्या किमतीची ‘धूम’ होती, असे
येथील स्थानिक शेतकरी गिरीधर ठोंबरे यांनी सांगितले.
बारामतीच्या जनावरे बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर, अनिल खलाटे, दत्तात्रय सणस, बापट कांबळे यांनी सांगितले, की दुधाचा व्यवसाय हक्काचा आहे. दूधदर वाढल्याने जनावरांचे बाजारदेखील तेजीत आहेत. बारामती बाजार समितीच्या आवारात पिण्याचे पाणी, जनावरे धुण्याची व्यवस्था, विक्रीपश्चात सेवा आदी सुविधा असल्याने तीन-चार जिल्ह्यातून शेतकरी या ठिकाणी येतो. साधारणत: ३०० ते ३५० जनावरांची विक्री होते.
या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांना सुरक्षितता वाटते. फसवणुकीचे प्रकार होत नाहीत. जनावरांची चोरी होत नाही. बाजार समितीला सुमारे ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न आठवड्याला या बाजारातून मिळते.
विदर्भातील शेतकरी दूध व्यवसायात
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत विदर्भातील शेतकºयांना दुग्ध उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. साधारणत: ४० शेतकरी यामध्ये सहभागी झाले. त्यांनी आज बारामती बाजार समितीच्या जनावरे बाजारात प्रत्यक्ष जनावरे खरेदी-विक्री, गार्इंच्या जाती, म्हशी आदींची माहिती घेतली. हे शेतकरी प्रशिक्षणानंतर सामूहिक दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करणार आहेत. काहींनी श्रीगोपाला नावाची संस्था सुरू करून व्यवसाय सुरू केला आहे. या प्रशिक्षणात शेतकºयांना जनावरांचे आहार, पैदाशीसाठी सिमेन, मुरघास, मुक्तसंचार गोठा आदींची माहिती दिली जाते, असे केव्हीकेचे डॉ. आर. एस. जाधव यांनी सांगितले.