वन विभागाकडून १७५ पाणवठ्यांवर प्राणी प्रगणना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 01:41 PM2019-05-13T13:41:08+5:302019-05-13T13:50:40+5:30
बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात वन विभागातर्फे दरवर्षी प्राणी गणना केली जाते...
पुणे : वन विभागातर्फे येत्या बुद्ध पौर्णिमेला चार अभयारण्यामधील १७५ पाणवठ्यांवर प्राणी प्रगणना केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व तयारी वन विभागातर्फे पूर्ण केली आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, मयुरेश्वर-सुपे आणि अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी आणि माळढोक अभयारण्यात वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही वन्यप्राणी प्रेमी प्राणी प्रगणनेच्या उपक्रमात सहभाग घेणार आहेत.
पुणे वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखिडे म्हणाले, बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात वन विभागातर्फे दरवर्षी प्राणी गणना केली जाते. वन विभागाकडून भीमाशंकरच्या अभयारण्यात आढळणाऱ्या वन्य, प्राणी व पक्षांची प्रगणना केली जाते. त्यात प्रामुख्याने शेकरू, बिबट्या, रानडुक्कर, वानर, माकड आदी वन्य प्राण्यांची
नोंद घेतली जाते. त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यात चिंकारा, काळवीट आदींची गणना केली जाते. पुणे व अहमदनगर या दोन्ही अभयरण्यातील प्राणी व पक्षांची प्रगणना येत्या १८ व १९ मे रोजी केली जाणार आहे.
वानखिडे म्हणाले, प्राण्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेवून अभयारण्यातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांवर प्राणी प्रगणना केली जाते. दिवसा कृत्रिम पाणवठ्यांवर माणसांकडून हस्तक्षेप केला जातो. रात्री हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्रत्यक्ष दिसणाऱ्या प्राण्यांची नोंद घेतली जाते. मात्र, सर्वच प्राणी दररोज पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत नाहीत. तसेच पाणवठ्यावर आलेल्या सर्वच प्राण्यांची नोंद घेता येत नाही. त्यामुळे सध्या इंडेक्स पद्धतीने प्राणी प्रगणना केली जात आहे. परंतु, या पद्धतीतून वन्य प्राण्यांच्या संख्यात्मक वाढीचा अंदाज घेता येतो.
........
* प्राणी प्रगणनेच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबतच्या सूचनांचे परिपत्रक वन विभागाकडून काढण्यात आले आहे. त्यानुसार सध्या उन्हाळा असल्याने एकच प्राणी दोन वेळा पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येवू शकतो. त्यामुळे एकाच प्राण्याची दोन वेळा नोंद करू नये. निसर्गानुभव घेण्यासाठी येणाºया व्यक्तींनी निसर्गाशी समरूप होणारे कपडे परिधान करावे.
*भडक रंगाचे किंवा पांढरे शुभ्र कपडे वापरू नये. उग्रवास असलेली सुगंधी द्रव्ये कपड्यावर लावू नये. रात्री सर्च लाईट किंवा विजेचा वापर करू नये. अभयारण्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या घेवून जाऊ नये, आदी सूचना वन विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.