शासकीय समितीबाबत अंनिस असमाधानी
By admin | Published: January 9, 2017 04:15 AM2017-01-09T04:15:32+5:302017-01-09T04:15:32+5:30
जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची पुनर्रचना करण्यात आल्याचा दावा शासनाने केला असला
पुणे : जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची पुनर्रचना करण्यात आल्याचा दावा शासनाने केला असला, तरीही जुनीच समिती पुढे रेटण्यात आली आहे, अशी टीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने केली आहे. या समितीविषयी समाधानी नसल्याचे अंनिसने म्हटले आहे.
शासनाने नुकतीच या समितीची पुनर्रचना केली आहे. २३ सदस्यांच्या या समितीमध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव (सहअध्यक्ष) आणि अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व मुक्ता दाभोळकर, राज्य सचिव माधव वावगे (सदस्य) यांचा समावेश आहे. समितीमधील तसेच अन्य अशासकीय सदस्यांमध्ये पुरुषोत्तम आवारे पाटील, सुरेश झुरमुरे, छाया सावरकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
२० डिसेंबर २०१३ पासून राज्य शासनाने लागू केलेल्या जादूटोणा प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. समितीची बैठक वर्षातून किमान २ वेळा होईल. समितीतील अशासकीय सदस्यांना वित्त विभागाने ठरवून दिलेले भत्ते दिले जाणार आहेत. आॅगस्ट २०१४ अन्वये स्थापन केलेल्या समितीची पुनर्रचना करण्याची गरज वाटत असल्याने पुनर्रचना केल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. सामाजिक न्यायमंत्री या समितीचे अध्यक्ष, तर सामाजिक न्याय राज्यमंत्री उपाध्यक्ष आहेत. (प्रतिनिधी)