वनस्पतींचा डेटा बँक तयार करणारी निसर्गकन्या अनिता किंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:10 AM2021-03-08T04:10:39+5:302021-03-08T04:10:39+5:30
------------ पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अभ्यास करताना तिने गवतापासून ते झुडूप आणि वन्यजीवांपासून ते संकटग्रस्त छोट्या जिवांवर संशोधन केले. त्यातूनच ...
------------
पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अभ्यास करताना तिने गवतापासून ते झुडूप आणि वन्यजीवांपासून ते संकटग्रस्त छोट्या जिवांवर संशोधन केले. त्यातूनच तिने गवत, झुडपांचा डेटा तयार केला. आतापर्यंत ७०० पेक्षा अधिक वनस्पतींची माहिती तिच्याकडे आहे. हे करत असताना फोटोग्राफीचा छंदही जपला. तिच्या वन्यजीवांच्या फोटोंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
—————————————-
अनिताने सासवड येथे शिक्षण घेतले असून, एम.एस्सी. केले आहे. सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. करत आहे.
मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर इथे वनस्पतीशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी म्हणून काम करीत असताना महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील वनस्पतींचा अभ्यास केला आणि त्याचा डिजिटल डेटाबेस तयार करून www.indianflora.org या संकेतस्थळावर जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. वनस्पतींचा शास्त्रीय अभ्यास करताना त्यांचे वर्गीकरण व वृक्षसंवर्धन करण्याचे काम केले. जंगलामध्ये वनस्पतींच्या अभ्यासात-शोधात भटकंती करीत असताना हळूहळू फुलपाखरं आणि बाकी वन्यजीव आवडू लागले, त्यांच्या हालचाली, अधिवास, लाईफ सायकलचे निरीक्षण करून तिने नोंदी ठेवल्या. वन्यजीवांच्या अभ्यास करताना वन्यजीव फोटोग्राफीची विशेष रुची निर्माण झाली. निसर्गावरच्या प्रेमाखातर तिने रखरखत्या उन्हात, सह्याद्रीच्या अवघड डोंगर रांगावर, पावसाळ्या रात्री, काळोखात भटकंती केली.
पुण्यातील काही शाळांसाठी एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन, पुणे विद्यापीठ येथे नेचर वॉक/ट्रेल करून ही माहिती देण्याचे काम चालू असते. वनस्पतीविषयी माहिती लोकांना मिळावी म्हणून लेख लिहून किंवा फोटोंमधून जनजागृतीचे काम अनिता करीत आहे. जमेल तसे देशी वृक्षांची लागवड करणे, तण काढणे, परिसर स्वच्छ ठेवणे, फुलपाखरांसाठीची बाग कशी करावी यावर माहिती देणे ही कामेही सुरू आहेत.
अनिता सांगते, पुरंदर तालुका तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो खरा पण इथल्या रानमाळावरची जैवविविधता, अधिवास मला दूर जाऊ देत नाही. 3 वर्षांपूर्वी माझे लग्न झालेे; लग्नामध्ये पत्रिका न छापता सोशल मीडियाचा वापर करून सर्वांना निमंत्रण दिले गेले, कपड्यांचा आहेर किंवा सत्कार न ठेवता मी आंब्याची आणि लिंबाची झाडे सर्व वऱ्हाडी मंडळींना दिली. या माझ्या छोटयाशा कार्याची दखल घेत वसुंधरा प्रतिष्ठान, इको फाउंडेशन व सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वसुंधरा विशेष गौरव पुरस्कार मला मिळाला.’’
आमच्या वाईल्डलाईफ फोटोग्राफी करणाऱ्या ग्रुपमध्ये सुरुवातीला अनेकदा मी एकटीच मुलगी किंवा आम्ही १-२ चं मुली असायचो. पण घरातल्यांनी कधी मला आडकाठी केली नाही. माझे निर्णय, करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिलं. आज जागतिक महिला दिनानिमित्त मला ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, पर्यावरणाचा अभ्यास, वाईल्डलाईफ या थोड्याशा वेगळ्या किंवा ऑड वाटा आहेत खऱ्या पण जर तुमच्या घरातील मुलींना त्याची आवड असेल किंवा त्यांना त्यामध्ये करिअर करायचे असेल तर त्यांना अडवू नका, मुलींना एकटीने जंगलात फिरणे शोभणारे नाही असं म्हणू नका....उलट तिला स्वसंरक्षण कसे करायचे हे सांगा. आईवडील/पती/सासरचे म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलात तर त्याही या क्षेत्रात पुढे येतील. जंगलातून फिरताना कायम अलर्ट राहून रानवाटांचा आनंद घ्या !