अंजनगाव-उंडवडी सुपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:42+5:302021-08-17T04:15:42+5:30
निकृष्ट कामाची चौैकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी उंडवडी कडेपठार: अंजनगाव ते कारखेल - उंडवडी सुपे (ता. बारामती) या नव्याने तयार ...
निकृष्ट कामाची चौैकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी
उंडवडी कडेपठार: अंजनगाव ते कारखेल - उंडवडी सुपे (ता. बारामती) या नव्याने तयार केलेल्या रस्त्याची दोन महिन्यांत दुरवस्था झाली. डांबरीकरण केलेला रस्ता खचल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांनी केली आहे.
अंजनगाव ते सोनवडी सुपे मार्गे- कारखेल - उंडवडी सुपे या गावांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्यास नऊ किलोमीटरच्या कामाला मुख्यमंत्री सडक योजनेतून ४ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसानंतर हा रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने खचलेला रस्ता गडबडीत पुन्हा खोदून काढला आहे. त्यामुळे याठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहने पाण्यात आदळत आहेत. तसेच या खड्ड्यात वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. हा रस्ता पाटस ते माळेगावला जोडणारा करण्यासाठी एकमेव जवळचा व महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच दुचाकी, चारचाकींसह जड वाहनांची वर्दळ असते. विशेषत: खडीचे ट्रक याच मार्गे सर्वाधिक धावतात. मात्र, हा रस्ता एकाच पावसानंतर अनेक ठिकाणी खचला आहे. खचलेला रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून होत आहे.
अंजनगाव ते उंडवडी सुपे हा रस्ता अवघ्या दोन महिन्यांत खचला असून ठिकठिकाणी अशी खडी वर आली आहे.
१६०८२०२१-बारामती-०५