अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हाताने पडद्याची उघडझाप; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 02:33 AM2019-03-12T02:33:06+5:302019-03-12T02:33:12+5:30

गेल्या तीन महिन्यांपासून बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील पडद्याची आटोमॅटिक यंत्रणा बंद आहे.

Anna Bha Sathe dramatically open screen; Ignoring municipal administration | अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हाताने पडद्याची उघडझाप; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हाताने पडद्याची उघडझाप; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील पडद्याची आटोमॅटिक यंत्रणा बंद आहे. हाताने हा पडदा खेचून उघड- बंद करावा लागत आहे. पडद्याची दुरूस्ती व्हावी म्हणून व्यवस्थापकांनी यासंदर्भात बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांंना तब्बल सात ते आठ वेळा पत्रव्यवहार करूनही प्रशासन ढिम्मच राहिले आहे. फक्त पडद्याचा रोप खराब झाल्याने तो अडकत आहे, अशी सारवासारव महापालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात येत असली तरी तिन्ही पडदे आणि यंत्रणेसंदर्भात महापालिकेने खासगी कंपनीशी केलेला करार संपुष्टात आल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे कळते. मात्र याबाबत संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून कमालीचे मौन बाळगले जात आहे.

एक महिन्यापूर्वी अभिनेता प्रियदर्शन जाधव याने बिबवेवाडीच्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या तिस-या घंटेनंतर सहजपणे न उघडणा-या ‘पडद्यावर’ भाष्य करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. या समस्येकडे तीन महिने व्यवस्थापनाच्या झालेल्या दुर्लक्षाबाबत त्याने पोस्टद्वारे नाराजी दर्शविली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील समस्या...
पडदा उघडण्याची आॅटोमँटिक यंत्रणा बंद
निम्मे माईक बंद अवस्थेत
स्वच्छातागृहांची दुरावस्था
निआॅन साईनच्या
फलकाचा विद्युत पुरवठा बंद

सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकांसाठी
३,५०० रुपये भाडे
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह हे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा नाटकांसाठी 3500 रूपये इतक्या अल्पदरात दिले जाते. त्यामुळे पालिकेला या नाट्यगृहामधून फारसे उत्पन्न मिळत नाही. मग त्या नाट्यगृहाच्या देखभाल दुरूस्तीवर इतका खर्च करायचा का? अशा प्रकारची महापालिकेची मानसिकता बनली असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुन:श्च फिरोदिया करंडक स्पर्धेदरम्यान हाच अनुभव सर्वांना मिळाला. परीक्षक स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित, दीपक राजाध्यक्ष यांसारख्या मराठी कलाकारांनी पडदा स्वत: हाताने उघडून बंद करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. लाखो रूपये खर्च करून नाट्यगृहे तर उभारली जातात. मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्तीचे काय? हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा समोर आला आहे.
अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील तिन्ही पडदे आणि यंत्रणेची जबाबदारी ज्या खासगी कंपनीला दिली होती. त्या कँनरा कंपनीबरोबरचा करार संपला असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधला असता ’मला काही कल्पना नाही तुम्ही विद्युत विभागाशी संपर्क साधा असे सांगून चेंडू विद्युत विभागाच्या कोर्टात सरकवला.
नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांनी याच आयुक्तांशी पडद्यासह इतर गोष्टींची दुरूस्ती करण्यासंदर्भात तीन महिन्यांपूर्वी सात ते आठ वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र सहाय्यक आयुक्तांनी यावर भाष्य करण्यास टाळाटाळ दर्शविली. तर विद्युत विभागाने तर पडद्याासंदर्भात कोणत्याच खासगी कंपनीशी करार केला नसल्याचे सांगितले आहे. नक्की खर काय? याचे गूढ मात्र कायम आहे.

तिन्ही पडदे आणि यंत्रणेसंदर्भात कोणत्याही खासगी कंपनीशी करार केलेला नाही. आॅटोमँटिक यंत्रणा बंद आहे हे खरे आहे. त्यामुळे हाताने पडदा उघड-बंद करावा लागत आहे. रोप खराब झाल्याने पडदा अडकत आहे. लवकरच हे काम केले जाईल.
- श्रीनिवास कंदुल, विद्युत विभाग, महापालिका

फिरोदिया करंडक स्पर्धेदरम्यान परीक्षक स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित, दीपक राजाध्यक्ष यांनी स्वत: नाट्यगृहातील पडदा हाताने उघड-बंद करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते पडदा उघडत आहेत याचे सर्वांनाच वाईट वाटले. याबाबत नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांनी अनेकदा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र प्रशासनाने त्यांच्या पत्रांची दखल घेणे गरजेचे आहे.
- अजिंक्य कुलकर्णी, आयोजक फिरोदिया करंडक

Web Title: Anna Bha Sathe dramatically open screen; Ignoring municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.