अण्णा भाऊ साठे स्मारकावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 02:34 AM2019-02-22T02:34:06+5:302019-02-22T02:34:58+5:30

मातंग समाजाचे आंदोलन : जगताप व कांबळे एकमेकांना भिडले

Anna Bhau Sathe shouted from the memorial | अण्णा भाऊ साठे स्मारकावरून गदारोळ

अण्णा भाऊ साठे स्मारकावरून गदारोळ

googlenewsNext

पुणे : बिबवेवाडी येथील बीओटी तत्त्वावर बांधलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे, या मागणीसाठी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी पत्रके भिरकावून प्रशासनाचा निषेध केला. मुख्य सभेमध्ये चर्चेला तोंड फुटल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप आणि भाजपाचे नगरसेवक सुनील कांबळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. समाजाची दिशाभूल करण्याच्या विषयावरून नगरसेवक एकमेकांना भिडले होते. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याने वाद थंडावला.

सातारा रस्त्यावरील या स्मारकामध्ये नाट्यगृह उभारलेले आहे. यासोबतच साठे स्मारकासाठी स्वतंत्र ग्रंथालय, स्वतंत्र अभ्यासिका, स्वतंत्र संगणक लॅब व अण्णा भाऊ साठे कलादालन करण्यासाठी पालिकेकडून निधीची मान्यता मिळालेली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पार पडलेली आहे. त्याची वर्क आॅर्डरदेखील झालेली आहे. विलंबाचा धागा पकडत कॉँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप, बाबूराव चांदेरे, दिलीप बराटे आदी नगरसेवक आक्रमक झाले. प्रश्नाला उत्तर देताना नगरसेविका मानसी देशपांडे यांच्या विधानावर आक्षेप घेतल्याने वातावरण तापले.
जगताप म्हणाले, ‘‘मातंग समाजाच्या तरुणांची उपेक्षा
करू नका, अनेक वर्षे उपेक्षित राहिलेल्या समाजाबाबत असा पवित्रा घेणे चूक आहे.’’
समाज आक्रमक होऊन आंदोलन करील, असे आक्रमकपणे मुद्दे मांडत असतानाच भाजपाचे नगरसेवक सुनील कांबळे यांनी ‘तुम्ही नुसत्या गप्पा मारता, समाजाची दिशाभूल कोण करतो?’ असा प्रश्न केला. यावर जगताप यांनी ‘मी गप्पा मारत नसून समाजाच्या व्यथा मांडतोय, त्या समजून घ्या’ असे म्हटल्यानंतर या विषयावरून कांबळे व जगताप यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्त सौरभ राव, सर्वपक्षीय गटनेते यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन स्मारकाची पाहणी करून प्रलंबित कामांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केल्यावर वाद शांत झाला.

मुख्य सभागृहाबाहेर दलित स्वयंसेवक संघ, लोकायत, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, लहुजी ब्रिगेड, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, दलित महासंघ, क्रांतिगुरू लहुजी शक्ती सेना, लहुजी वस्ताद प्रतिष्ठान, लहुजी छावा संघटना, ईगल कामगार सेना, अखिल भारतीय बहुजन सेना, अण्णा भाऊ स्मारक संस्थेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. सभागृहामध्ये व बाहेरही निषेध पत्रके भिरकावली.

Web Title: Anna Bhau Sathe shouted from the memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे