पानापानांमध्ये उलगडणार ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:13 AM2021-02-09T04:13:25+5:302021-02-09T04:13:25+5:30
पुणे: महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र साहित्यासह, त्यातील प्रतिमांचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेणारा 'अण्णा ...
पुणे: महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र साहित्यासह, त्यातील प्रतिमांचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेणारा 'अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ हा ग्रंथ ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांच्या संशोधनपर लेखणीतून साकार झाला आहे. लोककवी, विचारवंत अण्णा भाऊ साठे यांच्या या जन्मशताब्दी वर्षामध्येच ही वाङ्मय भेट वाचकांना मिळणार आहे.
डॉ. विश्वास पाटील यांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला असून, तो प्रकाशनासाठी राजहंस प्रकाशनकडे सोमवारी (दि. ८) सुपूर्द केला. या वेळी राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, लेखक सोपान खुडे, प्रभाकर ओव्हाळ, डॉ. संतोष खेडलेकर आदी उपस्थित होते.
या ग्रंथाविषयी डॉ. विश्वास पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितलं की, ‘अण्णा भाऊंचे ‘फकिरा’ हे पुस्तक मी पाचवीमध्ये असताना वाचले होते. ज्या परिसरात अण्णा भाऊ मोठे झाले. त्याचं ‘वारणे’च्या पाण्यावर मी देखील मोठा झालो. त्यामुळे अण्णा भाऊंबद्दल ममत्व होते. कुणीतरी लेखकाने त्यांचे चरित्र मांडणे गरजेचे होते. अण्णा भाऊंना न्याय मिळाला नाही, असे वाटत होते. त्यामुळे या ग्रंथलेखनाचे काम हाती घेतले. हा ग्रंथ म्हणजे अण्णा भाऊंचे वाङ्मयीन चरित्र आहे. यात अण्णा भाऊंचा जीवनपट मांडण्याबरोबरच त्यांच्या साहित्यकृतींचे वेगळेपण अधोरेखित केले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या असंकलित कथा खूप आहेत. त्यांच्या १७१ कथा मी मिळविल्या, त्यातल्या बऱ्याच प्रकाशितदेखील झालेल्या नाहीत. मुन्शी प्रेमचंद आणि बंगालीतील ज्येष्ठ,श्रेष्ठ लेखक शरदचंद्र यांच्यानंतर स्त्रीजीवनाचा विलक्षण धांडोळा घेणारा हा मराठीतला खूप मोठा लेखक असल्याचे जाणवले. चिरागनगरच्या एका झोपडीत अण्णा भाऊ सलग २२ वर्षे लेखन करीत होते.
वाचकांना काही माहिती नसलेल्या गोष्टी देखील यात वाचायला मिळतील. अण्णा भाऊंच्या व्यक्तिमत्त्वामुळे चळवळी कशा झपाटल्या होत्या. त्याचाही मागोवा ग्रंथात घेण्यात आला आहे. अण्णा भाऊंचे हयात असलेले अनेक नातेवाईक, त्यांचा सहवास लाभलेले स्नेहीजन अशा अनेकांशी बोलून हे पुस्तक साकारण्यात आले आहे.
--------------------------------------------------------
अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या साहित्यिकाची मराठी साहित्य दरबारात म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही असं मनापासून वाटलं. अण्णा भाऊंसारख्या मोठ्या साहित्यिकावर एका मोठ्या लेखकाकडून जर लेखन झाले, तर मराठी वाचकांपर्यंत अण्णा भाऊ खऱ्या अर्थाने पोहोचू शकतील याच भूमिकेतून आम्ही हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. लवकरचं म्हणजे अण्णा भाऊ साठे यांच्या १ ऑगस्ट या जन्मशताब्दी वर्षपूर्ती पूर्वीच हे पुस्तक वाचकांच्या हातात येईल, या दृष्टीने पुस्तक प्रकाशनाचे नियोजन आहे.
- दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन