'अण्णा हजारे निर्भीड व्यक्तीमत्व, जेल भरो आंदोलनास आमचा पाठिंबा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 05:41 PM2021-08-30T17:41:46+5:302021-08-30T17:42:21+5:30
चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शनही घेतलं. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर प्रवेश करतानाही पोलिसांची तारांबळ उडाली.
पुणे - कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातील मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनाच्या दबावामुळे सरकार आज संध्याकाळपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश देईल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. तसेच, यावेळी अण्णा हजारेंच्या भूमिकेचं स्वागतही केलं. अण्णा हे निर्भीड व्यक्तीमत्व आहेत, असे पाटील यांनी म्हटलं.
चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शनही घेतलं. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर प्रवेश करतानाही पोलिसांची तारांबळ उडाली. भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर चंद्रकांत पाटील, महापौर, मुळीक यांनी गणपतीची आरती केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. आता, या बहिऱ्या सरकारला ऐकू येईल ही अपेक्षा आहे. मंदिर उघडी करा, नियम ठरवा, निवडक संख्येत लोकांना मंदिराच्या आत सोडावे. नियमांचं पालन भाविकांनी केलं पाहिजे. अण्णा हजारे निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असेही पाटील यांनी सांगितले. १० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील, असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला.
अण्णांचा सरकारला इशारा
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सरकारवर संतापले. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे, असेही अण्णांनी म्हटले, तसेच सरकारला इशाराही दिला.