कारेगावच्या महिलांचे अण्णा हजारेंना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 02:10 AM2019-03-12T02:10:52+5:302019-03-12T02:11:03+5:30
एमआयडीसीतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी
शिरूर : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील अवैध धंदे बंद व्हावेत, यासाठी कारेगावातील अवैध धंदे स्वत: उद्ध्वस्त करणाऱ्या
कारेगाव येथील रणरागिणींनी धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन या प्रश्नात
लक्ष घालण्याची मागणी केली.
एमआयडीसी व परिसरातील गांवांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्ये सुरू आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर कारेगाव येथील महिलांनी पोलीस कारवाई करीत नसल्याचा निषेध करीत महिलादिनी अवैध धंदे उद्ध्वस्त केले. महिलांनी हे धंदे उद्ध्वस्त केल्याने या महिलांना अवैध धंदेवाल्यांचे धमकीचे कॉलही आले. पोलीस याबाबत ठोस कारवाई करीत नसल्याने या महिलांनी ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांची भेट घेऊन या अवैध धंद्याबाबत हजारे यांना अवगत केले व एमआयडीसी परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने बोकाळलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्त केले.
हजारेंनी केले महिलांचे कौतुक
एमआयडीसीचे अधिकारी, कारेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी या धंद्यांना कशाच्या आधारे परवानगी दिली, याबाबत माहिती देण्याचे आवाहन या महिलांनी हजारे यांना केले. महिलांच्या या व्यथा जाणून घेतल्यानंतर अण्णा हजारे यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. या प्रश्नाबाबत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन हजारे यांनी दिल्याचे महिलांनी सांगितले. हजारे यांनी महिलांच्या बहादुरीचे कौतुक केले.
स्थानिक पुढारी, स्वयंघोषित नेते लक्ष देत नसल्याने या महिलांनी हजारे यांच्याकडे धाव घेतली. हजारे यांनीही थेट पोलीस अधीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधल्याने अवैध धंद्यांवर कारवाई होईल, असा विश्वास महिलांमध्ये निर्माण झाला आहे.