सामाजिक न्याय विभागाचे आण्णाभाऊ साठे व दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 07:04 PM2019-02-13T19:04:18+5:302019-02-13T19:09:56+5:30
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात येणारे लाेकशाहीर आण्णाभाऊ साठे व पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
पुणे : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात येणारे लाेकशाहीर आण्णाभाऊ साठे व पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 15 फेब्रुवारी राेजी सायंकाळी 5 वाजता पुण्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षि विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालय नाना पेठ येथे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम हाेणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा पुरस्कार वितरण साेहळा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हाेणार आहे. या साेहळ्याला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडाेले, पालकमंत्री गिरीष बापट, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, महापाैर मुक्ता टिळक आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील मातंग समाजाच्या विकासासाठी याेगदान देणाऱ्या मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना आण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात येताे. दरवर्षी पंचवीस व्यक्तींना प्रत्येकी 25 हजार, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच सपत्निक गाैरव करण्यात येताे. तर सहा संस्थांना प्रत्येकी 50 हजार, पुरस्कार, शाल व श्रीफळ देऊन गाैरव करण्यात येताे. यंदा सन 2017-18 आणि 18- 19 या दाेन वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
याबराेबरच दादासाहेब गायकवाड यांचे पुराेगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये अत्यंत माेलाची कामगिरी केली आहे. त्यांचे कार्य विचाराच घेऊन राज्य शासनाकडून दरवर्षी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. एक व्यक्ती व एक संस्थेला प्रत्येकी 51 हजार व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.