अण्णांची बहीण अन् अरुणाची आत्या हीच मोठी पदवी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:29 AM2019-03-06T01:29:25+5:302019-03-06T01:29:33+5:30

अण्णांचे काम मोठे आहे, हे पूर्वीच ओळखले होते. आयुष्यभर त्यांनी चांगल्या कार्याला महत्त्व दिले.

Anna's sister and Aruna's grandiose title | अण्णांची बहीण अन् अरुणाची आत्या हीच मोठी पदवी

अण्णांची बहीण अन् अरुणाची आत्या हीच मोठी पदवी

Next

पुणे : अण्णांचे काम मोठे आहे, हे पूर्वीच ओळखले होते. आयुष्यभर त्यांनी चांगल्या कार्याला महत्त्व दिले. मी आणि वहिनी अण्णांना आमच्या कुवतीप्रमाणे सहाय्य करीत आलो. खरे तर अण्णांचे काम डोंगराएवढे आहे. आम्ही केवळ खारीचा वाटा उचलला. अण्णांच्या मुलांवर वेगळे असे संस्कार करावे लागले नाहीत. चांगल्या-वाईटाची परीक्षा करा, एवढचे मुलांना सदोदित सांगितले. डॉ. रा. चिं. ढेरे यांची बहीण आणि डॉ. अरुणा ढेरे यांची आत्या हीच आयुष्यातील सर्वात मोठी पदवी असल्याचे भावोद्गार श्रीमती प्रमिलाताई चिंतामण ढेरे यांनी व्यक्त केले.
कला-साहित्य-सामाजिक कार्य या क्षेत्रात लक्षणीय कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी अव्याहतपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीशक्तीचा जन्मदा प्रतिष्ठान आणि स्वानंदी पुणे या संस्थांतर्फे तपस्या पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाचा पुरस्कार श्रेष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या भगिनी आणि प्रसिद्ध लेखिका, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या आत्या श्रीमती प्रमिलाताई चिंतामण ढेरे यांना सोमवारी प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदाचे दहावे वर्ष आहे.
मयूर कॉलनीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात प्रसिद्ध चित्रकार शि. द. फडणीस आणि शकुंतला फडणीस यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमती प्रमिलाताई ढेरे यांच्या खंबीर; पण शांत, समर्पित व सेवाभावी जीवनकार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. जन्मदा प्रतिष्ठानचे मिलिंद सबनीस,
स्वानंदी पुणेच्या अपर्णा केळकर व्यासपीठावर होत्या.
आयुष्याच्या वाटचालीत रक्ताच्या नात्यापलीकडे प्रेम करणारी माणसे मिळाली, म्हणून निभावता आले, असे सांगून श्रीमती प्रमिलाताई ढेरे म्हणाल्या, की आयुष्यात धन मिळाले नाही, याची खंत वाटली नाही. अनेकांच्या प्रेमाच्या जोरावर सर्व जण आयुष्य संपन्न आणि सन्मानाने जगलो. प्रास्ताविकात मिलिंद सबनीस यांनी संस्थांच्या कार्याची महिती दिली. गंगोत्री बिल्डरचे गणेश जाधव तसेच अपर्णा आवटे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात साची कोल्हापुरे हिने गायिलेल्या भूमाता स्तोत्राने झाली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा केळकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात समजुतीच्या काठाशी... ही मैफल झाली. यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या कविता, ललितलेख, कथा यांचे वाचन आणि काही कवितांचे
गायन झाले. या कार्यक्रमाचे संहितालेखन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे होते. यात
अपर्णा केळकर, अनुराधा जोशी, अक्षय वाटवे, गौरी देशपांडे, स्नेहल दामले, मिलिंद गुणे, आनंद कुºहेकर यांचा सहभाग होता.
>पुण्याईमुळे संमेलन यशस्वी
अरुणा ढेरे यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामागील रहस्य काय आहे हे आज समजले, असे सांगून शि. द. फडणीस म्हणाले, ‘अरुणा ढेरे यांना त्यांच्या शालेय जीवनात प्रमिलाताई यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. त्यांनी शब्दांच्या माध्यमातून भरतकाम, कशिदाकाम केले असणार. नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनापूर्वी वादळे उठली. अरुणा त्याला कशी तोंड देणार, असा प्रश्न मनात आला होता. पण पुण्याईमुळे संमेलन यशस्वी झाले. संपूर्ण महाराष्ट्र तिच्यामागे उभा राहिला. कुठल्याही परिस्थितीत तोल न जाणे हा ढेरे कुटुंबाचा वारसा आहे तो तिने जपला,’ असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

Web Title: Anna's sister and Aruna's grandiose title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.