आॅनलाईन घोषणेचा पुरता बोजवारा
By admin | Published: May 1, 2017 02:28 AM2017-05-01T02:28:59+5:302017-05-01T02:28:59+5:30
राज्य शासनाने या वर्षापासून आंतरजिल्हा बदली आॅनलाईन करण्याच्या घोषणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पुणे विभागात
बारामती : राज्य शासनाने या वर्षापासून आंतरजिल्हा बदली आॅनलाईन करण्याच्या घोषणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पुणे विभागात पात्र शिक्षकांची १ मेपर्यंत अर्ज करण्याची असणारी मुदत आज पूर्ण होत आहे. मात्र, संकेतस्थळावरील पोर्टल बंद राहत असल्याने शिक्षकांची प्रचंड धावपळ सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.
ग्रामविकास विभागाने या वर्षापासून आंतरजिल्हा बदल्या जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावरून करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी शासनाकडे कोणतीही पूर्वतयारी नसल्याचा अनुभव शिक्षकांना येत आहे. आंतरजिल्हाबदलीसाठी सरलप्रणालीत आॅनलाईन अर्ज करण्यास सुचविण्यात आले आहे, यासाठी शिक्षकांना १ मेपर्यंत अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, सरलप्रणालीतील स्टाफ पोर्टल व ट्रान्स्फर पोर्टल वारंवार बंद राहत असल्याने शिक्षक धास्तावले आहेत.
आधीच वर्षानुवर्षे घरापासून दूरवरच्या जिल्ह्यात नोकरी करणारे शिक्षक प्रचंड तणावाखाली आहेत. आंतरजिल्हा बदली अर्जासाठी शिक्षक कायम केल्याची (स्थायित्व लाभ) जिल्हा परिषदेची मंजुरी आवश्यक केली आहे. मात्र, १०-१२ वर्षे नोकरी करूनही जिल्हा परिषदेकडून अद्यापही स्थायित्व लाभ मिळालेला नाही. या शिक्षकांना स्थायित्व लाभ त्वरित देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिल्याने जिल्हा परिषदेत धावाधाव सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी शासनाने कोणतेही प्रशिक्षण दिलेले नाही. त्यातच पुन्हा मागील काळात सेवा केलेल्या सर्व शाळांची माहिती स्टाफपोर्टलमधे भरायची आहे. वारंवार साईट बंद राहणे सर्व्हर डाऊन होणे, पोर्टल लॉगिन न होणे यामुळे शिक्षक प्रचंड वैतागले आहेत. मुदतीत आॅनलाईन अर्ज न भरल्यास बदलीची संधी मिळणार नाही, या भीतीने शिक्षक रात्री-अपरात्रीजागून माहिती भरत आहेत. पुणे विभागासाठी १ मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली, मात्र अजूनही बहुतेक शिक्षक संकेतस्थळ बंद असल्याने पोर्टलवर माहिती भरू शकले नाहीत. ग्रामविकास विभागाने आदेश देऊनही अनेक शिक्षकांना स्थायित्व लाभ मिळाला नसल्याने माहिती कशी भरणार, अशी प्रतिक्रिया शिक्षक व्यक्त करीत आहेत. विभागात मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
वरिष्ठांशी चर्चा : मग निर्णय घेऊ
आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत आज सोमवारी
(दि. १ मे) पूर्ण होत आहे. आज संध्याकाळपर्यंत संबंधित शिक्षक अर्ज भरणार आहेत. त्यातूनदेखील अर्ज न भरू शकणाऱ्या शिक्षकांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. सर्व शिक्षकांचे अर्ज भरून घेण्यात येतील. कोणीही अर्ज भरण्याच्या प्रक्रि येपासून वंचित राहणार नाही. वरिष्ठांशी चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे यांनी दिली.
देखावा नको, जिल्हाबदलीसाठी रोस्टर पूर्ण करा : मारणे
राज्यस्तरीय आॅनलाइन बदली अर्ज मागितले तरी रोस्टर पूर्ण नसल्याने पुणे जिल्ह्यामधील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडणार आहे. आॅनलाइनचा देखावा न करता तत्काळ रोस्टर पूर्ण करण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे, अशी माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली.