शहरावर ऐन सणासुदीत कचरा संकट
By Admin | Published: October 8, 2014 05:22 AM2014-10-08T05:22:01+5:302014-10-08T05:22:01+5:30
गेल्या महिनाभराचे वीजबिल थकल्याने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाची वीज पुन्हा ‘महावितरण’ने तोडली आहे.
पुणे : गेल्या महिनाभराचे वीजबिल थकल्याने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाची वीज पुन्हा ‘महावितरण’ने तोडली आहे. सुमारे आठ लाख रुपयांची थकबाकी असल्याने हा प्रकल्प गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरात पुन्हा पाऊस सुरू झाला असल्याने साचलेला कचरा भिजला असल्याने, या कचऱ्यावर इतर प्रकल्पांतही प्रक्रिया करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये शहरावर पुन्हा एकदा कचरासंकट ओढावले आहे.
शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे १६०० टन कचऱ्यावर पालिकेकडून हंजर, दिशा, रोकेम; तसेच अजिंक्य या प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केली जाते. तर, उर्वरित कचरा उरुळी येथील कचरा डेपोमध्ये कँपिंग केला जातो. त्यात सर्वाधिक ३०० ते ३५० टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाचे वीजबिल थकबाकी असल्याने प्रकल्प व्यवस्थापनाकडून ती भरण्यास असर्मथता दर्शविण्यात आल्याने ‘महावितरण’कडून वीज तोडली जात आहे.
या पूर्वी दोन वेळा ‘महावितरण’ने या प्रकल्पाची वीजजोड तोडला असताना, पालिकेने ही थकबाकी भरली आहे. दरम्यान, मागील महिन्याचे सुमारे ८ लाखांचे बिल थकल्याने तीन दिवसांपूर्वी या प्रकल्पाची वीज तोडण्यात आली होती. त्यातच महापालिकेस सलग पाच दिवसांची सुटी असल्याने हे बिल प्रशासनाने भरलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प आज दिवसभरही अंधारतच असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पात प्रक्रिया न होणारा कचरा शहरात; तसेच पालिकेच्या कचरा रॅम्पवर साठवून ठेवण्यात आलेला आहे.(प्रतिनिधी)