शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:42+5:302021-04-30T04:14:42+5:30
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. त्यामुळे वर्षभरात विद्यार्थ्यांना सुट्टीच जाहीर केली नाही. ...
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. त्यामुळे वर्षभरात विद्यार्थ्यांना सुट्टीच जाहीर केली नाही. परंतु, आता पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्याने शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने १६ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास प्राधान्य दिले होते. शिक्षकांनी सुध्दा विविध अडचणी सामना करत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. काही शिक्षकांनी परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू केले.
शासन निर्णयानुसार दरवर्षी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सर्वसामान्यपणे १ मे रोजीचा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा केल्यानंतर २ मे ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर केली जाते. परंतु, यंदा शासनाकडून सुट्टी बाबतीत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना सुट्टी मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.
--
शाळांना सुट्टी देण्याबाबत अद्याप शिक्षण विभागाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच शिक्षकांनी किती तारखेपर्यंत निकाल तयार करून विद्यार्थ्यांना वितरित करायचे आहेत, याबाबतही स्पष्टता दिली नाही. तसेच यंदा सुट्टी दिली जाणार आहे की नाही याबाबत शिक्षक, विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत. त्यामुळे शाळांना सुट्टी दिली जाईल की यापुढे ऑनलाईन शिक्षण कायम सुरू राहील, हे शासनाने स्पष्ट करावे.
- नारायण शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे जिल्हा
---
राज्याचे शिक्षण संचालक दरवर्षी मार्च महिन्यात शैक्षणिक वर्षाच्या सुट्टी, पहिल्या व दुसऱ्या सत्राची सुरुवात व समाप्ती बाबत पत्र प्रसिद्ध करतात. मात्र, यंदा असे पत्र प्रसिद्ध केले नाही. त्यामुळे सत्र केव्हा संपणार, नवीन सत्र केव्हा सुरू होणार आणि विद्यार्थ्यांचा निकाल केव्हा जाहीर करणार, याबाबत संभ्रम आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा निकालाबाबत उत्सुकता राहिलेली नाही.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महासंघ