अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 03:46 PM2020-09-04T15:46:59+5:302020-09-04T15:57:39+5:30
येत्या ४ ते १२ सप्टेंबर या कालावधीत प्रवेशाची दुसरी फेरी राबविली जाणार आहे.
पुणे: इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश फेरीच्यासाठी राबविल्या जात असलेल्या दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक माध्यमिक उच्चशिक्षण संचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आले असून, येत्या ४ ते १२ सप्टेंबर या कालावधीत प्रवेशाची दुसरी फेरी राबविली जाणार आहे. तसेच पहिल्या नियमित फरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी एका दिवसाची वाढीव मुदत देण्यात आली आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या नियमित फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३ सप्टेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करण्यास मुदत देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीतून प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच विद्यार्थी , पालक व कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी मुदत वाढ मिळावी, अशी विनंती शिक्षण विभागाकडे केले. त्यामुळे पहिल्या नियमित फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी नियमित फेरी ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.या फेरी अंतर्गत ४ सप्टेंबर रोजी रिक्त असलेली पदे दर्शविली जाणार आहेत. तसेच ५ सप्टेंबरपासून दुस-या नियमित फेरीसाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वी भरलेले पसंतीक्रम बदलता येणार आहेत. तसेच ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीमध्ये प्रवेश अर्जाचा पहिला व दुसरा भाग विद्यार्थ्यांना भरता येऊ शकतो. विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रातून किंवा माध्यमिक शाळांमधून अर्ज व्हेरिफाय आणि एडिट करू शकतील.
दुस-या नियमित प्रवेश फेरी अंतर्गत दिल्या जाणा-या प्रवेशाची गुणवत्ता यादी १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध केली जाईल. या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास आपल्या लॉगिन मधून प्रोसीड फॉर अॅडमिशन करावे लागेल.तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागेल.
........................
ज्या विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर जायचे असेल किंवा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल, त्या विद्यार्थ्यांना विड्रॉल ऑफ अँप्लिकेशन या सुविधेचा वापर करून अर्ज मागे घेता येऊ शकतो.विड्रॉल ऑफ अँप्लिकेशन केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज सिस्टीम मधून रद्द होईल. मात्र,विद्यार्थ्यांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून पुढे जाणे अपेक्षित आहे. जर एखाद्या विद्याथ्यार्ने चुकीने विड्रॉल ऑफ अँप्लिकेशन बटन क्लिक केले तर अर्ज पुन्हा अन विड्रॉ करण्याची सुविधा शिक्षण उपसंचालक लॉगीन मध्ये देण्यात आलेली आहे.
...................
प्रथम पसंतीक्रमानुसार मिळालेला प्रवेश बंधनकारक?
पहिला पसंतीक्रम निवडल्यानंतर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला. तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित संधी दिली जाणार नाही. त्यांना केवळ विशेष फेरीमध्ये संधी मिळणार आहे.
....................
प्रवेश रद्द केल्यास काय होईल?
जर घेतलेल्या प्रवेश रद्द करायचा असेल तर विद्यार्थी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाला विनंती करून आपला प्रवेश रद्द करू शकतात.मात्र, घेतलेल्या प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील नियमित फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागणार आहे.
............
दुसऱ्या प्रवेश फेरीच्या महत्त्वाच्या तारखा
- ४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता दुस-या नियमित फेरीची रिक्त पदे दर्शविणे
- दुस-या नियमित फेरीसाठी ५ ते ७ सप्टेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवणे
- ८ ते ९ सप्टेंबर पात्र विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी तयार करणे
- १० सप्टेबर रोजी १० वाजता दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
- १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत मिळालेला प्रवेश निश्चित करणे