पुरंदर-लोहगाव विमानतळाबाबत लवकरच घोषणा : आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 07:31 PM2020-03-02T19:31:03+5:302020-03-02T19:33:40+5:30
गुंतवणुकीसाठी पुणे योग्य शहर
पुणे : शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोहगाव आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळांबाबत लवकरच सकारात्मक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (दि. २) दिली. राज्यामधे गुंतवणूक करण्यास पुणे योग्य शहर असल्याचा अभिप्रायही त्यांनी नोंदवला.
पुण्यातील गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’च्या वतीने (एमसीसीआए) दोन दिवसीय ‘इंटरनॅशनल बिझनेस समीट’चे आयोजन करण्यात आले आहे, त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, महासंचालक प्रशांत गिरबाने या वेळी उपस्थित होते. इटली, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, मलेशिया आणि जर्मनीसह सुमारे २० देशांचे कौन्सिल जनरल, व्यापार आयुक्त आणि शहरातील उद्योगपती यात सहभागी झाले होते.
ठाकरे म्हणाले, ‘‘शिक्षण, उद्योग, कृषी, संशोधनासह सर्व क्षेत्रांत राज्य आघाडीवर आहे. इंटरनेटचे जाळे राज्यभर पसरले आहे. त्यामुळे महाराष्ट्र गुंतवणूक करण्यासाठी सर्वार्थाने योग्य राज्य आहे. राज्यात गुंतवणूक करणाºयांचे आम्ही स्वागत करू.’’ त्यातही गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी पुणे अत्यंत योग्य ठिकाण असल्याचे ठाकरे म्हणाले. शाश्वत शेतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर औद्योगिक क्षेत्राने भर द्यावा. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई देण्याचा निर्णय विधानसभेतील चर्चेनंतर होईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक सर्व बाबी पुण्यात उपलब्ध आहेत. शिक्षण, संशोधन, आरोग्य आणि सेवा क्षेत्रात पुणे आघाडीवर असल्याचे भार्गव म्हणाले. सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे अध्यक्ष पी. सी. नांबियार, विकफिल्ड प्रॉडक्ट एलएलपी’चे व्यवस्थापकीय संचालक मुकेश मल्होत्रा, ‘प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, ‘पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे आणि ‘प्रवीण मसालेवाले’चे संचालक आनंद चोरडिया यांनी त्यांच्या उद्योगाचा प्रवास उलगडला. गिरबाने यांनी आभार मानले.