भारती विद्यापीठाच्या ‘आम्ही भारती’ उपक्रमाची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:16 AM2021-08-19T04:16:00+5:302021-08-19T04:16:00+5:30
स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने भारती विद्यापीठाच्या ‘आम्ही भारती‘ या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त बोधचिन्हाचे प्रकाशन करताना डॉ. विश्वजित कदम बोलत होते. या वेळी ...
स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने भारती विद्यापीठाच्या ‘आम्ही भारती‘ या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त बोधचिन्हाचे प्रकाशन करताना डॉ. विश्वजित कदम बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारती विद्यापीठदेखील हिरक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या ५८ वर्षांमध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील, तळागाळातील, सर्वसामान्य, कष्टकरी कुटुंबातील युवा पिढीला शिक्षणातून समृद्धीकडे नेण्यासाठी विद्यापीठ झटत आहे. कर्मचारी वर्गापासून ते माजी विद्यार्थ्यांचे मोठे जाळे गावपातळीपासून ते जगभर विणले गेले आहे. भारती विद्यापीठाचा कर्मचारी वर्ग, माजी व आजी विद्यार्थी आणि शुभचिंतकांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत विद्यापीठ हाती घेणार आहे.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, विद्यापीठाने घडविलेले कर्तृत्ववान विद्यार्थी हीच विद्यापीठाच्या कार्याची खरी ओळख आहे. विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच नेहमी समाजहिताला प्राधान्य दिले. ‘आम्ही भारती’ या मोहिमेच्या माध्यमातून निर्माण होणारा संवाद सेतू विद्यापीठाच्या सामाजिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल.