कुटुंबाचे उत्पन्न होणार जाहीर

By admin | Published: January 22, 2017 04:46 AM2017-01-22T04:46:25+5:302017-01-22T04:46:25+5:30

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्रामध्ये सुधारणा केली आहे. उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी, मत्ता व दायित्व, शैक्षणिक अर्हता, अपत्य

Announcement of family income will be announced | कुटुंबाचे उत्पन्न होणार जाहीर

कुटुंबाचे उत्पन्न होणार जाहीर

Next

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्रामध्ये सुधारणा केली आहे. उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी, मत्ता व दायित्व, शैक्षणिक अर्हता, अपत्य, निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे हमीपत्र आदी जोडावे लागणार आहे. मालमत्तेची माहिती देणे उमेदवारांना गरजेचे होते त्यात सुधारणा करून उमेदवारांना कुटुंबाचे उत्पन्न शपथपत्रात द्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.
महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. या पद्धतीमध्ये मतदान कशाप्रकारे करावे, मतपत्रिकेचा रंग कसा असेल याची सविस्तर माहिती मतदारांना मिळालीच पाहिजे. त्यासाठी महापालिकांनी किमान दोनवेळा स्थानिक वृत्तपत्रातून जाहिरात द्यावी, दूरचित्रवाहिन्यांना स्ट्रिप द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिला होता. त्यामुळे जाहिरातबाजीपुरते मर्यादित राहू नका, मतदानाची माहिती देणारी सविस्तर व्हिडीओ क्लिप महापालिका संकेतस्थळांवर उपलब्ध करा, महत्त्वाच्या चौकात बॅनर लावा, असा आदेश आयोगाने महापालिकांना दिला आहे.
उत्पन्नाबाबतच्या तरतुदीत सुधारणा
निवडणूक आयोगाने शपथपत्रामध्ये उमेदवाराच्या कुटुंबाचा समावेश केला आहे. प्रत्येक उमेदवाराने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, कुटुंबाची जंगम-स्थावर मालमत्ता यांचा तपशील द्यावा अशी सुधारणा केली आहे. उमेदवाराने यापूर्वी मागील निवडणूक लढविली असल्यास त्या निवडणुकीवेळी सादर केलेल्या जंगम, स्थावर मालमत्ता आणि थकीत रकमांच्या माहितीचा गोषवारा उमेदवारी अर्जासमवेत जोडावा, असे सक्तीचे केले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. नगरसेवकांच्या सांपत्तिक स्थितीत कशी वाढ झाली आहे, याची माहितीही नागरिकांना मिळणार आहे.
(प्रतिनिधी)

मतपत्रिका : प्रत्येक जागेसाठी वेगळा रंग
बहुसदस्यीय प्रभागपद्धतीमध्ये मतदान यंत्रावर लावण्यात येणाऱ्या विविध जागांच्या मतपत्रिका मतदारांच्या चटकन लक्षात याव्यात, यासाठी प्रत्येक जागेसाठी वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका निश्चित करण्यात आल्या आहेत. मतपत्रिका पांढरा (प्रभाग अ), फिका गुलाबी (ब), फिका पिवळा (क), फिका निळा (ड), तर फिका हिरवा (ई) या रंगाच्या आहेत. रंगसंगतीबरोबरच मतपत्रिकेवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशी आरक्षणांची नोंद आहे. त्यात स्त्री आणि सर्वसाधारण यांचाही नामोल्लेख आहे. उमेदवाराचे नाव आणि चिन्हाबरोबरच नोटा (नन आॅफ दि अबॉव्ह - वरीलपैकी कोणीही नाही) या पर्यायाचा समावेशही मतपत्रिकेवर आहे.

ध्वनिचित्रफित महापालिकेच्या वेबसाइटवर
महापालिका आयुक्तांनी या सर्व बाबींची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये चार अथवा काही प्रभागांमध्ये तीन किंवा पाच मते कशाप्रकारे द्यावयाची याची माहिती द्यावी. या संदर्भातील सविस्तर माहिती देणारी ध्वनिचित्रफित महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करावी. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर लावून प्रसिद्धी द्यावी, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.

- महापालिका सार्वत्रिक निवडणुकांचे अधिक्षण, संचालन आणि नियंत्रणाची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने मतपत्रिकेचा नमुना, मतपत्रिकेचा रंग, प्रभागातील जागांना क्रमांक देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागातील प्रत्येक सदस्यपदाच्या जागेला अ, ब, क, ड आणि ई अशा रीतीने क्रमांक देण्यात आले आहेत. म्हणजेच १अ, १ब, १क आणि १ड अशी रचना आहे.

Web Title: Announcement of family income will be announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.