खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा हवेतच, तात्पुरती डागडुजी केलेले रस्ते पुन्हा ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:24 AM2017-12-18T05:24:23+5:302017-12-18T05:25:00+5:30
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. मात्र, तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. विविध रस्त्यांची ‘लोकमत टीम’ ने पाहणी केली असता हे वास्तव समोर आले. अनेक रस्त्यांवर अद्यापही मोठमोठे खड्डे असून, यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मंत्र्यांची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
लोणावळा : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. मात्र, तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. मावळ तालुक्यातील विविध रस्त्यांची ‘लोकमत टीम’ ने पाहणी केली असता हे वास्तव समोर आले. अनेक रस्त्यांवर अद्यापही मोठमोठे खड्डे असून, यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मंत्र्यांची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून
येत आहे.
महाराष्ट्रातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करू ही घोषणा केवळ घोषणाच ठरली आहे. मुंबई व पुणे या दोन्ही शहरांना जोडणाºया मावळ तालुक्यातील व लोणावळा ग्रामीण भागातील अनेक रस्ते आजही खड्डेमय आहेत. तर जे खड्डे मोठा गाजावाजा करून बुजवले ते देखील योग्य पद्धतीने बुजविले न गेल्याने ते पुन्हा उखडले असल्याचे निदर्शनास आले आहेत.
मावळ तालुक्यातील एक रस्ता खड्डे विरहित दाखवा व बक्षीस मिळवा, अशी योजना जाहीर करत मावळ तालुका युवक काँग्रेसने खड्डेताई व सार्वजनिक बांधकाम विभागाचा विवाह सोहळा पावसाळा अखेरीस लावला होता. त्यानंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडून मावळातील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी नागरिकांची अपेक्षा असताना अपेक्षाभंग झाला आहे. लोणावळा ते पौड या प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. मात्र हे काम म्हणजे दगडापेक्षा विट मऊ असे झाले आहे. खड्डे भरले गेले असले तरी ते काम योग्य प्रकारे न झाल्याने वाहने चालविताना त्रास जाणवत आहे. खड्डे भरताना ते रस्त्याला समांतर भरले न गेल्याने काही ठिकाणी खोलगटपणा तर काही ठिकाणी उंचवटा तयार झाला आहे. लहान आकाराचे अनेक खड्डे तसेच आहेत.
यासह कार्ला फाटा ते मळवली रस्ता, देवले, पाटण, भाजे, बोरज, वाकसई ते जेवरेवाडी, वेहेरगाव, देवले ते औंढे पूल, कुसगाव गावात जाणारा रस्ता आदी अनेक गाव रस्ते आजही खड्डेमय आहेत. काही रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. मात्र काम इतके हलक्या दर्जाचे आहे की पुढे खड्डे बुजवले जातात व मागे ते उखडले जात आहेत. मावळातील रस्ते कामाकरिता कोट्यवधींचा निधी मंजूर झाला, पण पाठपुरावा व इच्छाशक्ती अभावी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे तालुक्यातील रस्त्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे आजही अनेक रस्ते खड्डेमय पहायला मिळत आहेत.
गहुंजे शिरगाव रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती संथगतीने-
गहुंजे : गहुंजे-शिरगाव या रस्त्याची धोकादायक खड्ड्यांमुळे दुरवस्था झाल्याबाबत ‘लोकमत’ने छायचित्रासह सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यांनतर रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असली तरी दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. स्थानिक शेतकºयांसह परिसरातील वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
गहुंजे ते शिरगाव रस्ता जिल्हा परिषदेच्या उत्तर विभाग बांधकाम विभागाने तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून या लेखाशीर्षानुसार ११ सप्टेंबर २०१४ रोजी दिलेल्या कामाच्या आदेशानुसार सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात २२ लाख ३३ हजार ९४४ रुपये खर्चून बांधला. मात्र गेल्या वर्षी व यावर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्याची लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे पुन्हा दुरवस्था झाली असल्याचे चित्र दिसत होते. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘गहुंजे-शिरगाव रस्त्याची वाट’ या शीर्षकाने वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रस्त्याची शिरगाव बाजूने दुरुस्ती सुरू करण्यात आली. मात्र मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याने वाहनचालकांची गैरसोय दूर झालेली नाही.
गहुंजे व सांगवडे ग्रामस्थांना, शेतकºयांना सोमाटणे फाटामार्गे बाजार करण्यासाठी तळेगाव तसेच तालुक्याचे मुख्यालय वडगाव मावळ येथे शेतीविषयक व इतर कामांकरिता सातत्याने जावे लागते. गहुंजे, सांगवडे भागातील विद्यार्थ्यांना शिरगाव, सोमाटणे, तळेगाव परिसरातील शाळा व महाविद्यालयांत दररोज ये-जा करण्यासाठी गहुंजे-शिरगाव रस्त्याचा वापर करावा लागतो. तळेगाव औद्योगिक विभागात कामावर जाणाºया कामगारांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच सोमाटणे येथील टोल चुकविण्यासाठी इतर व्यावसायिक वाहने याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने वर्दळ सर्वाधिक आहे. मात्र रस्त्यांवर गहुंजे हद्दीत मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात डांबरीकरण झालेले असून, वाहनांची वर्दळ सतत वाढत आहे. या रस्त्याचे रुंदीकरणासह दुरुस्ती व डांबरीकरण काम दर्जेदार होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. पावसाळा संपला असल्याने तातडीने खड्डे बुजाविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
पवनमावळातील रस्त्यांची स्थिती ‘जैसे थे’
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनानगर : पवनमावळ परिसरामध्ये विविध गावांमध्ये जाणाºया मुख्य रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पवनानगर-कामशेत रस्त्याचे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी बुजवले आहे.
आर्डव ते ब्राह्मणोली हा रस्ता सुमारे सात किलोमीटर लांबीचा असून, या रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाईप टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. मात्र, ये-जा करणाºया नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फलक लावला नसल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. संबंधित ठेकेदाराच्या मते काम लवकरात लवकर होण्याच्या मार्गावर आहे.
पवनाधरणाच्या पश्चिम पट्टयामधील मोरवे फाटा ते कोळेचाफेसर हा रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला असून, या ठिकाणाहून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र होणार असल्याची घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे.
तात्पुरती मलमपट्टी कितपत टिकणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
कार्ला : कार्ला फाटा ते वेहेरगाव, कार्ला फाटा ते भाजे, मळवली ते पाटण या रस्त्यांवरील खड्डे शासनाने दिलेल्या १५ डिसेंबरच्या ‘डेडलाईन’पूर्वी जरी भरले असले, तरी ही तात्पुरती मलमपट्टी असून या परिसरातील पावसाचे प्रमाण पाहता ते भरलेले खड्डे पावसाळ्यात टिकतील का? हा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे.
फक्त काम उरकायचे हे गणित डोक्यात ठेवूनच हे खड्डे बुजविले आहेत. तसेच मळवली सदापूर, मळवली बोरज या रस्त्याचे खड्डे आहे त्याच स्थितीत आहेत. अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित यंत्रणांना निवेदन दिले असतानाही परिसरातील इतर ठिकाणचे खड्डे बुजविले जात असताना आमच्यावर अन्याय का असा प्रश्न रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांना पडला आहे़
तळेगाव-चाकण रस्त्यावरील खड्डे कायम - तळेगाव दाभाडे : तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महामार्गावरील तळेगाव दाभाडे ते चाकण रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागास अपयश आले आहे.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्रचा केलेला दावा खड्ड्यात गेला आहे. तथापि या मार्गावरील केवळ मोठे खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, या मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून, त्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने सुमारे १८०० कोटी रुपये नुकतेच मंजूर केले आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्यात रस्ते हस्तांतरणाबाबत ताळमेळ दिसत नाही. तळेगाव चाकण रस्त्याची दुरवस्था कायम असून, याची किंमत वाहनचालकांना हकनाक मोजावी लागत आहे. केवळ दहा मीटर रुंदीचा अरुंद रस्ता, साईडपट्ट्यांचा अभाव आणि राज्यमहा मार्गाचेही निकष दिसून न येणा-या या रस्त्याचे भवितव्य अजूनही अधांतरी आहे.
यापूर्वी या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि ते वेळीच भरले न गेल्याने अनेक वाहनचालकांना आणि प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे.
तळेगाव दाभाडे : तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महामार्गावरील तळेगाव दाभाडे ते चाकण रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागास अपयश आले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्रचा केलेला दावा खड्ड्यात गेला आहे. तथापि या मार्गावरील केवळ मोठे खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, या मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून, त्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने सुमारे १८०० कोटी रुपये नुकतेच मंजूर केले आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्यात रस्ते हस्तांतरणाबाबत ताळमेळ दिसत नाही. तळेगाव चाकण रस्त्याची दुरवस्था कायम असून, याची किंमत वाहनचालकांना हकनाक मोजावी लागत आहे. केवळ दहा मीटर रुंदीचा अरुंद रस्ता, साईडपट्ट्यांचा अभाव आणि राज्यमहा मार्गाचेही निकष दिसून न येणाºया या रस्त्याचे भवितव्य अजूनही अधांतरी आहे.
यापूर्वी या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि ते वेळीच भरले न गेल्याने अनेक वाहनचालकांना आणि प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे.
पायी चालणेही झाले कठीण
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, अंदर मावळ आणि पवनमावळातील ग्रामीण भागातील रस्त्यावर तर माणसाला पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.
मागील अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बौर ते थुगाव सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये वारंवार वाहने आदळून वाहनांच्या नुकसानी बरोबरच वाहनचालकांना मणक्याचे, कंबरेचे त्रास जाणवू लागले आहेत. वाहन खड्ड्यांमध्ये आदळून वारंवार अपघातही होत आहेत. त्यामुळे याठिकाणी होणाºया अपघातांना सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तसेच मळवंडीमधून जाणाºया पवनानगर-सोमाटणे रस्त्यावरील मळवंडी गावाच्या हद्दीतील ओढ्याजवळ अनेक खड्डे तयार झाल्यामुळे या ठिकाणी वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत. जांभूळफाटा ते टाकवे रस्त्याचीदेखील मोठी दयनीय अवस्था झाली आहे.