टंकलेखन परीक्षेचा निकाल जाहीर; एकूण २४ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:53 PM2017-10-17T16:53:38+5:302017-10-17T16:57:50+5:30
संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाइन निकाल आज जाहीर झाला आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीची प्रति मिनिट ३० व ४० शब्द टंकलेखन परीक्षेचा एकूण निकाल अनुक्रमे ४१.६५ टक्के ४६ टक्के लागला आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आॅगस्ट २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाइन निकाल आज जाहीर झाला आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीची प्रति मिनिट ३० व ४० शब्द टंकलेखन परीक्षेचा एकूण निकाल अनुक्रमे ४१.६५ टक्के ४६ टक्के लागला आहे. दोन्ही परीक्षांमध्ये एकूण २४ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची आॅनलाईन प्रिंट घेता येईल. इंग्रजी विषयाची परीक्षा दि. १८ ते २३ आॅगस्टदरम्यान तर मराठी व हिंदी टंकलेखन परीक्षा २८ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत घेण्यात आली होती. मराठी व हिंदी ३० व ४० प्रतिशब्द मिनिट परीक्षेचा निकाल अनुक्रमे ३३.७८ व ४१.६९ टक्के, तर इंग्रजी परीक्षेचा निकाल ४६.३८ व ४६.६५ टक्के इतका लागला आहे. प्रति मिनिट ३० शब्द टंकलेखन परीक्षा एकूण ५० हजार ६४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी २० हजार ८५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ५९ जणांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तर ४० शब्द प्रतिमिनिट परीक्षेला बसलेल्या एकूण ७ हजार ८९७ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांची मूळ गुणपत्रके सर्व जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत संगणक टंकलेखन संस्थांना वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्याची गुणपत्रके व प्रमाणपत्र संस्थांमधून कार्यालयीन वेळेत मिळतील. गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी निकाल जाहीर झालेल्या तारखेपासून १० दिवसांत विद्यार्थ्यांना संस्थेतून अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी प्रति विषय १०० रुपये व उत्तरपत्रिका छायाप्रती मिळण्यासाठी प्रति विषय ४०० रुपये आॅनलाईन पद्धतीने २५ आॅक्टोबरपर्यंत भरावे लागेल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली.