खेळाडूंच्या सुविधांसाठी घोषणा अन् वाहने थेट रनिंग ट्रॅकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:23+5:302021-06-27T04:09:23+5:30
पुणे : मंत्री, नेते येणार असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ, मुख्य प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रम ठिकाणापर्यंत तैनात असलेले पोलीस, कार्यकर्त्यांची लुडबुड ...
पुणे : मंत्री, नेते येणार असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ, मुख्य प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रम ठिकाणापर्यंत तैनात असलेले पोलीस, कार्यकर्त्यांची लुडबुड आणि नियम धुडकावून थेट रनिंग ट्रॅकवर नेलेली वाहने असे चित्र शनिवारी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे पाहायला मिळाले.
क्रीडा विद्यापीठासाठी बालेवाडी क्रीडा संकुलाची पाहणी आणि आढावा बैठक शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. ट्रॅक खराब होईल म्हणून एरवी ट्रॅकच्या आजूबाजूलाही कोणाला फिरकू दिले जात नाही. ट्रॅकवरून चालू नका असे सांगण्यासाठीही सुरक्षारक्षक तैनात असतात. मात्र, शनिवारी मैदानाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकही ट्रॅकच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत होते. क्रीडा विद्यापीठाची घोषणा, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे ध्येय, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात अशी भूमिका मांडली जात असताना राज्यकर्ते, नेते, प्रशासकीय अधिकारी याच भूमिकेला पाठ कशी दाखवतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स मैदानावर असलेला रनिंग ट्रॅक आधीच खराब झालेला आहे. त्यात या ट्रॅकवर शनिवारी वाहने चालवण्यात आली. क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून भविष्यात अनेक खेळाडू घडवले जातील, अनेकांना संधी मिळेल, प्रशिक्षक प्रशिक्षण देतील, आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांचा टक्का वाढेल. मात्र, त्याचवेळी कठोर परिश्रम करून पुढे आलेल्या राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा खरंच मिळतील का? असा प्रश्न आजच्या प्रकारामुळे उपस्थित होत आहे.
मैदानाला दुरुस्तीची प्रतीक्षा
अॅथलेटिक्स मैदान १९९४मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यानंतर २००७ -०८ मध्ये या मैदानाची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत याच मैदानावर स्पर्धा झाल्या. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात या मैदानावर कोणतीही स्पर्धा झालेली नाही. क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच या रनिंग ट्रॅकचाही चेहरामोहरा बदलेल अशी अपेक्षा खेळाडूंना आहे.
कोट ---
क्रीडा विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर हे सर्व प्रकार बंद केले जातील. यापुढे कोणत्याही मैदानावर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व मैदानांची योग्य ती काळजी घेतली जाईल. - सुनील केदार, क्रीडामंत्री
फोटो - रनिंग ट्रॅक