अभियांत्रिकी प्रवेश प्राथमिक यादी जाहीर
By Admin | Published: June 20, 2016 01:17 AM2016-06-20T01:17:58+5:302016-06-20T01:17:58+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून रविवारी प्रवेशप्रक्रियेची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून रविवारी प्रवेशप्रक्रियेची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना येत्या १९ ते २१ जून या कालावधीत यादीवरील आक्षेप नोंदविता येतील. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी व प्रवेशप्रकियेचे सविस्तर वेळापत्रक बुधवारी (दि. २२) प्रसिद्ध केले जाणार आहे.
सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातील माहितीमध्ये किंवा इतर बाबींमध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. तसेच आवश्यक कागदपत्रही जमा करण्यात आले आहे. राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या एकूण उपलब्ध जागांपैकी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यंदाही राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ५० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. राज्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची संख्या वाढली असली तरी त्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या कमी आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येतात, सर्व शैक्षणिक सोई-सुविधा उपलब्ध असतील तेथेच अनेक विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. विद्यार्थ्यांना बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रियेची पुढील कार्यवाही करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)