पुणे जिल्हयातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:45 PM2019-03-11T18:45:29+5:302019-03-11T18:53:28+5:30
लोकसभेची आचार संहिता लागू झाली असून पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात तिस-या टप्प्यात आणि मावळ व शिरूर मतदार संघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
पुणे: केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीची घोषणा केली असून महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे.त्यात पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघापैकी पुणे व बारामती लोकसभा निवडणूक प्रक्रिया येत्या २८ मार्चपासून तर मावळ, शिरूर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया येत्या २ मे पासून सुरू होणार आहे,असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.
लोकसभेची आचार संहिता लागू झाली असून पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात तिस-या टप्प्यात आणि मावळ व शिरूर मतदार संघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांची अधिसूचना प्रसिध्द होण्यापासून अर्ज भरण्याचा कालावधी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखांबाबतचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केले आहे.
पुणे व बारामती लोकसभेसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदार संघाची निवडणूकीची अधिसूचना २८ मार्च रोजी प्रसिध्द होणार आहे. पुणे , बारामती मतदार संघासाठी ४ एप्रिलपर्यंतच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) सादर करता येतील. प्राप्त अर्जांची छाननी ५ एप्रिल रोजी होणार असून ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर शिरूर व मावळ मतदार संघाची आधिसूचना २ एप्रिल रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून येत्या २९ एप्रिल रोजी या दोन्ही मतदार संघात मतदान होणार आहे. शिरूर,मावळमधून निवडणूक लढविणा-या उमेदवारांना ९ मे पर्यंतच उमेदवारी अर्ज सादर करता येतील. येत्या १० एप्रिल रोजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे. या मतदार संघातील उमेदवारांना १२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.जिल्ह्यातील चारही मतदार संघाची मतमोजणी येत्या २३ मे रोजी होईल,असेही नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
-------------------------------
जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम
मतदार संघ अर्जाचा अंतिम दिनांक अर्ज मागे घेण्याचा दिनांक मतदानाचा दिनांक
पुणे ४ एप्रिल ८ एप्रिल २३ एप्रिल
बारामती ४ एप्रिल ८ एप्रिल २३ एप्रिल
शिरूर ९ एप्रिल १२ एप्रिल २९ एप्रिल
मावळ ९ एप्रिल १२ एप्रिल २९ एप्रिल