अमोल पालेकर यांना ‘झेनिथ एशिया सन्मान’ जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 07:42 PM2018-12-22T19:42:42+5:302018-12-22T19:48:30+5:30
’शेजारचा सखासोबती’ अशी मोहक प्रतिमा आणि स्त्रीच्या संवेदनशील व्यक्तिरेखांचा विस्तार करणारा चित्रपट दिग्दर्शक म्हणून नावलौकिक...
पुणे : ’शेजारचा सखासोबती’ अशी मोहक प्रतिमा निर्माण करणारा अभिनेता आणि स्त्रीच्या संवेदनशील व्यक्तिरेखांचा विस्तार करणारा तरल चित्रपट दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या अमोल पालेकर यांना आशय फिल्म क्लबतर्फे ‘झेनिथ एशिया सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे.
9 वा आशियाई चित्रपट महोत्सव दि. 24 ते 30 डिसेंबर दरम्यान पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, एशियन फिल्म फौंडेशन, मुंबई तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिल्म अँन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूटच्या सक्रीय सहयोगाने रंगणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन सोमवार दि. 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रख्यात आसामी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांच्या हस्ते होणार असून, उदघाटनानंतर संध्याकाळी ७.०० वाजता, काझीम ओझ दिग्दर्शित ’झेर’ हा तुर्की चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखविण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त देण्यात येणारा ‘झेनिथ एशिया सन्मान अमोल पालेकर यांना नवसिनेमाचे प्रणेते कुमार शाहनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता, अर्काइव्ह थिएटर, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आह, अशी माहिती आशय फिल्म क्लबचे प्रमुख आणि ९व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या सात दिवसीय चित्रपट महोत्सवात विविध विभाग करण्यात आले असून, चित्रपटांमधील कलावंत आणि दिग्दर्शक यांच्याशी संवाद आणि खुली चर्चा हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. त्यातील ‘इंडियन व्हिस्टा’ या विभागात गेल्या दोन वर्षात राष्ट्रीय स्तरावर गाजलेले भारतीय भाषांमधील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्यामध्ये बंगाली, आसामी, मल्याळम, ओडिया, मणीपुरी अशा विविध भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. ‘ऑफबीट बॉलीवूड’ या विभागात २०१७-१८ या वर्षातील लव्ह अँन्ड शुक्ला, तीन मुहर्त, भोर हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहता येणार आहेत. ‘सिंहावलोकन’ या विभागात डॅन वुल्मन या इस्रायली दिग्दर्शकाच्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. डॅन वुल्मन यांना गोवा चित्रपटमहोत्सवात जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याच्या निमित्त त्यांचा सन्मान म्हणून त्यांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तर मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करणारे पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दिनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून या तिघांचा ‘जोहार मायबाप जोहार’ हा संतपट दाखविला जाणार आहे. या महोत्सवात रसिकांना चार नवीन इराणी चित्रपटांचा आणि गतवर्षात गाजलेल्या ‘फर्जंद’, ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’, ‘पुष्पक विमान’ आणि ‘आरॉन’ या मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. ‘स्पेक्ट्रम एशिया’ विभागात वेगवेगळ्या आशियाई देशातील संस्कृती आणि जीवनशैली मांडणारे आठ चित्रपट दाखविले जाणार आहेत.
या महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे आणि आशियाई फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ३० डिसेंबर रोजी, संध्याकाळी ६.३०वाजता होणार आहे. या चित्रपट महोत्सवाची सांगता मिलिंद लेले दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे ’’अभिनीत बंदिशाळा’’ या नवीन चित्रपटाच्या प्रथम प्रदर्शनाने होणार आहे.