संतापजनक ! समाजकंटकांनी जाळली मुलांच्या ‘शिक्षणा’ची झोपडी ; भोरमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 11:10 AM2020-09-23T11:10:28+5:302020-09-23T11:11:44+5:30
गावात मोबाईलला नेटवर्क नसल्याने मुलांसाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून ही जागा निर्माण केली होती
पुणे : ऑनलाईन शाळेकरिता गावामध्ये मोबाईलला रेंज येत नसल्याने गावकऱ्यांनी मुलांसाठी गावाबाहेर उभारलेल्या ‘शिक्षणा’ची झोपडी अज्ञात समाजकंटकांनी जाळली. या आगीमध्ये मुलांचे शैक्षणिक साहित्यही जळून गेले असून ही घटना भोर तालुक्यातील नाटंबे या गावामध्ये मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकाराचा ग्रामस्थांनी निषेध केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील नाटंबे या गावची लोकसंख्या साधारणपणे 900 च्या आसपास आहे. या गावामध्ये 80 ते 90 मुले शालेय शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरु आहेत. परंतू, गावामध्ये मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्रामस्थांनी मुलांच्या नलाईन शाळा सुरळीत सुरु राहाव्यात याकरिता गावापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर एका उंच ठिकाणावर झोपडी बांधली होती. ऊन-वारा-पावासापासून मुलांचा बचाव होईल आणि मोबाईलला नेटवर्क येईल अशी देवधर-नीरा कालव्याजवळील जागा निवडण्यात आली होती. याठिकाणी बसून मुले अभ्यास करीत होती. मुले याठिकाणी बसूनच आॅनलाईन शिक्षण घेत होती.
परंतू, मुलांची ही ज्ञानजिज्ञासा काही समाजकंटकांना बघवली नाही. त्यांनी मंगळवारी मध्यरात्री मुलांच्या शिक्षणासाठी बांधलेली ही झोपडीच जाळून टाकली. मंगळवारी सकाळी जेव्हा मुले अभ्यासाकरिता याठिकाणी पोचली तेव्हा त्यांना झोपडी पूर्णपणे जळाल्याचे दिसले. त्यांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. सरपंच शोभा सुनिल खोपडे आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रभाकर जेधे यांच्या अध्यक्षांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मुलांसाठी पुन्हा झोपडी उभारुन देण्याची तयारी ग्रामस्थांनी सुरु केली आहे.
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. शाळांमधून मुलांना शालेय अभ्यासक्रमाचे व्हिडीओ पाठविले जात आहेत. यासोबतच ऑनलाईन तासही घेतले जात आहेत. परंतू, अनेक गावांमध्ये मोबाईलला नेटवर्कच नसल्याने या ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. परंतू, आपल्या मुलांना शिक्षण घेता यावे याकरिता पालक आणि ग्रामस्थांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. परंतू, काही समाजकंटक मुलांच्या या शिक्षण साधनेत अडथळा निर्माण करीत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
=====
मुलांचे शैक्षणिक नुकसान नको म्हणून देवधर-नीरा कालव्याजवळ झोपडी बांधून देण्यात आली होती. मुले या ठिकाणी दिवसभर अभ्यास करुन संध्याकाळी वह्या-पुस्तके तेथेच ठेवून घरी परतत होती. परंतू, कोणीतरी ही झोपडीच पेटवून दिली आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हा प्रकार निंदनीय आहे. मुलांसाठी आम्ही पुन्हा अभ्यासाची सोय करु. दोषींवर कारवाई व्हायला हवी.
- शोभा सुनिल खोपडे, सरपंच
=====
गावात मोबाईलला नेटवर्क नसल्याने मुलांसाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून ही जागा निर्माण केली होती. परंतू, ही झोपडी जाळण्यात आल्याने मुलांची अडचणी झाली आहे. तसेच त्यांचे शैक्षणिक साहित्यही जळून गेले आहे. एकीकडे ऑनलाईन शिक्षणातील अडचणी आणि दुसरीकडे ही समस्या यामुळे मुले आणि त्यांचे पालक हवालदील झाले आहेत. येथील नेटवर्कची समस्या प्रशासनाने दूर करावी.
- प्रभाकर जेधे, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती