संतापजनक! आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील भाषेत टिप्पणी; बारामतीत तीव्र निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 06:55 PM2021-05-27T18:55:14+5:302021-05-27T18:55:31+5:30
अश्लील भाषा वापरून केलेल्या मेसेजमुळे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या भावना दुखावल्या; संबंधित व्यक्तींवरकडक कारवाई करण्याची मागणी....
बारामती (सांगवी) : राज्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कवडी मोलाची किंमत देऊन सोशल मीडियावर खालच्या पातळीवर जाऊन अश्शील भाषेत टिप्पणी केल्या बद्दल बारामतीत काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. अश्लील भाषा वापरून केलेल्या मेसेजमुळे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे निषेध सभेत या घटनेबाबत संबंधितावर तातडीने कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्षा स्वाती धायगुडे यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात घरोघरी जाऊन जीव मुठीत धरून आशा व गट प्रवर्तक सर्वेक्षणाचे कामं बजावत आहेत. त्यातही वारंवार शासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून तूटपुंजा मानधनावर आजही कामं कारावे लागत आहे. तर घरोघरी गेल्या नंतर ग्रामस्थांची ऐकावी लागणारी बोलणी, अशातच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आशा स्वयंसेविका यांना रेपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे प्रशिक्षण देऊन अजून एक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्याची घोषणा केली होती. त्या संदर्भात मंगळवार (दि.२५) रोजी डेलिहंटवरील ऑनलाईन वृत्तावर खालच्या पातळीवर जाऊन अश्लील भाषेत तीन ते चार वेळा मेसेजद्वारे टिप्पणी केल्यामुळे आशा व गटप्रवर्तक यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
साध्याच्या परिस्थितीत अपुऱ्या मनुष्यबळामुळे आशा सेविकांना अँटिजन टेस्टचं प्रशिक्षण देऊन म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार करण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केलेल्या घोषणेच्या वक्तव्यावर फेक अकाऊंट वरून आशा व गट प्रवर्तक यांना अश्शील भाषेत टीका टिप्पणी केल्या बद्दल बारामती पंचायत समिती समोर संताप व्यक्त करून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी बारामती तालुक्यातील आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांनी निषेध सभा घेऊन सभापती,गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच या घटने नंतर आशा व गट प्रवर्तक पुणे जिल्हा सरचिटणीस श्रीमंत घोडके यांनी पुण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आशा स्वयंसेविका यांच्याकडून देण्यात आली.