संतापजनक! ...म्हणून जोडप्याने दोन महिन्यांच्या बाळाला रस्त्यावर सोडून दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 03:35 PM2020-10-08T15:35:15+5:302020-10-08T15:36:24+5:30
पुण्यातील खडकीमधील भयंकर घटना
पुणेः मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मंगळवारी सोनाली अडागळे यांना खडकीतील मेथॉडिस्ट चर्चच्या रस्त्याच्या कडेला दोन महिन्यांचे एक बाळ सापडले. त्यांनी या बाळाची माहिती खडकी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडले. अखेर पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश आले. या जोडप्याने एकत्र राहण्यासाठी हे बाळ फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दोन महिन्यांच्या बाळाला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या आई वडिलांविरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे वडील हे इंजिनियर असून खासगी कंपनीमध्ये काम करतात. त्यांच्यात आणि पत्नीत काही कौटुंबिक पातळीवर वाद सुरु होता. तसेच त्यांचा आपल्या पत्नीवर संशय देखील होता. या कारणावरून दोघांमध्ये सातत्याने भांडण होत असत. बाळ आपले नसल्याचेही पती म्हणत असत. त्यामुळे टोकाचे भांडण होत असल्याने या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. व दोघेही स्वतंत्र राहू लागले. पण काही कालांतराने त्यांनी पुन्हा एकत्र राहायला सुरुवात केली.पण यावेळी वडिलांनी माझ्यासोबत राहायचे असल्यास बाळाचा त्याग करावा लागेल असे पत्नीला बजावले. यानंतर या आईवडिलांनी बाळाला चर्च जवळ रस्त्याच्या कडेला सोडून दिले होते.
खडकीतील मेथॉडिस्ट चर्चजवळ बाळ सापडल्यानंतर खडकी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्याच्या आईवडिलांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली होती. सोशल मीडियावर हा शोध सुरु असतानाच सामाजिक कार्यकर्ते निलेश दास यांना व्हॉट्स अँपवर या बालकाचा फोटो ठेवून 'मिस यू' असे लिहिल्याचे आढळले. दास यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केल्यावर हे बाळ त्यांच्या बहिणीचे असल्याचे समजले. पण दास यांना खरा धक्का तेव्हा बसला ज्यावेळी या व्यक्तीने बाळाचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याचे सांगितले. परंतु, दास यांनी बाळ जिवंत असल्याचे सांगत त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती दिली. ज्यावेळी संबंधित व्यक्तीने ससून रुग्णालयात जात बाळ जिवंत आहे का नाही याची खात्री केली. मात्र त्यानंतर ह्या सर्व प्रकरणाचा उलगडा पोलिसांना झाला.