Raksha Bandhan: ‘वार्षिक आरोग्य तपासणी’ हीच रक्षाबंधनाची भेट; पुण्यातील डाॅक्टर भावाकडून ६ बहिणींचे अनोखे रक्षण!
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: August 11, 2022 03:23 PM2022-08-11T15:23:18+5:302022-08-11T15:23:27+5:30
रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आराेग्याचे रक्षण करू शकलाे हे खरे समाधान
पुणे : आज रक्षाबंधन. परंपरेनुसार बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते आणि ओवाळणी म्हणून भाऊदेखील साडी किंवा दाग-दागिने गिफ्ट देताे. सिंहगड रस्त्यावरील डाॅक्टर भावाने काळाची पावले ओळखून गेली चार वर्षांपासून काही वस्तूंऐवजी आपल्या सर्व सहा बहिणींना रक्षाबंधनानिमित्त दीर्घायुष्याची अनाेखी भेट देत आहे. ते दरवर्षी रक्षाबंधनाला सर्व बहिणींच्या प्रतिबंधात्मक आराेग्य चाचण्या करत आहेत. त्यामुळे संभाव्य आजारांचे निदान झाले आणि त्यावर वेळीच उपचार केले. त्यामुळे दीर्घायुष्याची ही अनाेखी भेट विशेष ठरली आहे.
आपल्या सण-उत्सवाला विधायक स्वरूप देणाऱ्या या डाॅक्टरांचे नाव आहे डाॅ. गाेपालकृष्ण गावडे. त्यांना सहा माेठ्या बहिणी आहेत. पेशाने वैद्यकीय व्यावसायिक असल्याने प्रतिबंधात्मक आराेग्याविषयी ते जागरूक आहेत. मात्र त्यांनी हीच बाब बहिणींना वारंवार सांगितली तरी प्रतिबंधात्मक आराेग्य चाचण्यांबाबत त्या फारसे गांभीर्याने घेत नव्हत्या. ही समस्या हेरून डाॅ. गावडे यांनी चार वर्षांपूर्वी रक्षाबंधनानंतर ओवाळणी म्हणून साडी किंवा इतर भेटवस्तू ऐवजी ‘वार्षिक आरोग्य तपासणी’ हीच तुमची रक्षाबंधनाची भेट असेल असे बहिणींना निक्षून सांगितले आणि ही मात्रा लागू पडली.
यात ते गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी पॅप स्मिअर, स्तनाच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी, हाडांचा ठिसूळपणा तपासण्यासाठी बोन डेन्सिटी, जनन इंद्रियांची आणि पोटातील इतर अवयवांची सोनोग्राफी, रक्तदाब, हिमोग्लोबीन, शुगर, कोलेस्टेरॉल, व्हिटॅमिन B13 आणि D3, थायरॉईड आदी १० तपासण्या दरवर्षी सर्व बहिणींच्या करून घेतात.
...म्हणून टळले हे धाेके
- या अनाेख्या उपक्रमातूनच मोठ्या बहिणीच्या गर्भाशयाला फायब्रॉईडची गाठ असल्याचे निदान झाले. त्यामुळेच तिचे हिमोग्लोबीन खूपच कमी झाले होते. हे निदर्शनास आल्यानंतरच लगेचच औषधोपचार सुरू झाले आणि धाेका टळला.
- दोन नंबरच्या बहिणीच्या ओव्हरीमध्ये छोटासा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले. त्यावरही यथायोग्य उपचार केले.
- तीन नंबरच्या बहिणीला बीपीचा त्रास असल्याचे उघडकीस आले. चार नंबरच्या बहिणीच्या हृदयाच्या तपासणीत 'मरमर' हा वेगळा आवाज ऐकू येत होता. तिच्या हृदयाची छोटी शस्त्रक्रिया करून ताेही दूर केला.
- तीन बहिणींना व्हिटॅमिन B12, डी ३ ची कमतरता असल्याचे आढळले. तसेच आईचीही हाडे ठिसूळ झाली हाेती. या सर्वांवर याेग्य ते उपचार केल्याने त्या निराेगी व आनंदी जीवन जगत आहेत.
रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आराेग्याचे रक्षण करू शकलाे हे खरे समाधान
''रक्षाबंधन, भाऊबीज यांसारख्या सणांमधून आपल्या आया-बहिणींचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण घेत असतो. जीवाचे रक्षण हे सर्वात मोठे रक्षण असते. त्यामुळे रक्षाबंधनाची जबाबदारी खऱ्या अर्थाने पेलायची असेल तर आपल्या बहिणींचे आरोग्य अधिक सुदृढ राहण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडील स्त्रियांनी प्राधान्यक्रमात स्वतःच्या आरोग्याला सर्वात शेवटचे स्थान दिलेले असते. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ नाही. हीच बाब हेरून मी रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आराेग्याचे रक्षण करू शकलाे हे खरे समाधान आहे. - डाॅ. गाेपालकृष्ण गावडे, सिंहगड राेड''