कुंपणासाठी आणखी ११ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:42 AM2017-08-17T01:42:52+5:302017-08-17T01:42:54+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विभाग व जंगलाला कुंपण घालण्यासाठी आतापर्यंत ६ कोटींचा चुराडा झाला आहे.

Another 11 crore for fencing | कुंपणासाठी आणखी ११ कोटी

कुंपणासाठी आणखी ११ कोटी

Next

दीपक जाधव ।
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विभाग व जंगलाला कुंपण घालण्यासाठी आतापर्यंत ६ कोटींचा चुराडा झाला आहे. त्याचबरोबर आणखी ११ कोटी रुपये खर्च करून कुंपणाच्या अनावश्यक बंदिस्त भिंती बांधण्याच्या वर्कआॅर्डर काढण्यात आल्या असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. हेरिटेज वॉल उभारत असल्याचा देखावा करून खुलेआम कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा ४०० एकरांचा विस्तीर्ण परिसर आहे. काही वर्षांपूर्वी विद्यापीठात सुरक्षारक्षकाचा खून झाला होता. त्यानंतर सुरक्षेच्या नावाखाली विद्यापीठात जिथे दिसेल तिथे कुंपण घालण्याची मोहीम उघडण्यात आलेली आहे. गेल्या २ ते ३ वर्षांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, क्रीडा विभाग अशा १२ विभागांना यापूर्वीच कुंपण घालण्यात आले असून त्यासाठी १२ कोटींचा खर्च झाला आहे. त्याचबरोबर आता आणखी ११ कोटी रुपये या कुंपणावर खर्च केले जाणार आहेत. त्याच्या वर्कआॅर्डरही देण्यात आल्या आहेत.
कुंपण बांधण्याच्या या वर्क आॅर्डर एकत्रितपणे न काढता वेगवेगळ्या काढून ६ ते ८ ठेकेदारांना त्याचे काम देण्यात आले आहे. मास्टर प्लॅननुसार हे सर्व कुंपण बांधण्याच्या कामाची निविदा एकत्रितपणे काढणे आवश्यक होते. मात्र, एकाच वेळी १७ कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेला मंजुरी मिळणे अवघड असल्याने १ कोटी, दीड कोटी, ४८ लाख अशा छोट्या-छोट्या रकमांच्या निविदा काढण्यात आल्याचे दिसून येते. ५ कोटींपेक्षा जास्त खर्चाची निविदा असेल, तर त्याला व्यवस्थापन परिषदेची मंजुरी घ्यावी लागते; मात्र ते टाळण्यासाठी एकाच कामाच्या छोट्या-छोट्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
एकाच कामाच्या दोन-दोन निविदाही काढण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी पुतळा सुशोभीकरणाच्या कामासाठी २५ एप्रिल २०१५ रोजी ६० लाख ३७ हजार रुपयांची एक वर्कआॅर्डर देण्यात आली. त्यानंतर पुन्हा १२ मार्च २०१६ रोजी आणखी एक २ कोटी ५२ लाख ७८ हजार रुपयांची वर्कआॅर्डर दुसºया ठेकेदाराला देण्यात आली आहे.
व्हीसी लाँज १ कोटी ७७ लाख, सोशल सायन्स कॉम्प्लेक्स (भाग २) ५८ लाख ५४ हजार, गेस्ट हाऊस प्रो व्हिसी बंगलो ७१ लाख ७४ हजार, अहमदनगर उपकेंद्र इमारत ३ कोटी ८४ लाख अशा कुंपण बांधण्याच्या वर्कआॅर्डर काढण्यात आलेल्या आहेत.
>कुलगुरूंच्या भूमिकेकडे लक्ष
पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले डॉ. नितीन करमळकर यांची विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्यानंतर विद्यापीठाचा कॅम्पस पर्यावरणपूरक बनविण्यावर भर देणार, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून ठिकठिकाणी कुंपण घालण्याच्या प्रकाराला कुलगुरूंकडून पायबंद घातला जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कुंपणावरच्या उधळपट्टीबाबत डॉ. करमळकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.
>चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
विद्यापीठात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वृक्षतोड करून महापालिकेच्या कोणत्याही परवानग्या न घेता बांधकामे करण्यात आली आहेत. इतर वेळा फुटकळ कारवाया करणाºया महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडला आहे. जुन्या वास्तूंना शासनाकडून हेरिटेजचा दर्जा दिला जातो; मात्र विद्यापीठात ते स्वत: बांधत असलेल्या दगडी कुंपणांना हेरिटेज वॉल असे सांगून फसवणूक करीत आहेत. ही विद्यार्थ्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे. या संपूर्ण बांधकामाची चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी.
- विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ते

Web Title: Another 11 crore for fencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.