बाणेरमध्ये आणखी २१२ खाटांचे कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:29+5:302021-04-24T04:11:29+5:30
पुणे : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालये उभारण्यात येत आहेत. बाणेर येथे आणखी एक कोविड सेंटर उभे ...
पुणे : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालये उभारण्यात येत आहेत. बाणेर येथे आणखी एक कोविड सेंटर उभे करणार आहे. याठिकाणी ऑक्सिजन जनरेटिंगचे चार प्लांट आणि लिक्विड ऑक्सिजन टँकची उभारणी केली जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३३ येथे पालिकेच्या मान्य विकास आराखड्यात वाणिज्य वापरासाठी आणि पार्किंग आरक्षण असलेली जागा आहे. ही जागा पालिकेच्या ताब्यात आहे. या जागेत २१२ खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या तयारीचा आढावा मोहोळ यांनी घेतला. या वेळी आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, बाबूराव चांदेरे, प्रल्हाद सायकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात वाढत आहे. यापूर्वी बाणेर कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात चांगली सुविधा व उपचार देण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर बाणेरमध्ये सर्व्हे क्रमांक ३३ येथे दुसरे कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे.
--
ऑक्सिजनची निर्मिती होणार
या कोविड रुग्णालयात १ हजार एलपीएम या क्षमतेचे चार ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन टॅंकचीही उभारणी केली जात आहे. वातानुकूलित इमारतीसह सीसीटीव्हीदेखील बसविण्यात आले आहेत.
-----
या कोविड रुग्णालयात १५० ऑक्सिजन बेड्स आणि ६२ आयसीयू बेड्स असणार आहेत.